America Political News : ट्रम्प म्हणाले, 'बायडन म्हणजे 'मंच्युरियन कॅन्डिडेट', तर बायडन म्हणाले ट्रम्प म्हणजे 'लुजर' हे आरोप - प्रत्यारोप आहेत 5 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आयोजित प्रेसिडेंशियल डिबेटमधले.
'CNN' च्या वतीनं 27 जून रोजी घेण्यात आलेल्या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात हू म्हणून जुंपली. अटलांटा येथे तब्बल 90 मिनिटं चाललेल्या या डिबेटमध्ये दोघांनीही एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेतलं. या दोघांमधील दुसरं डिबेट 10 सप्टेंबर रोजी होईल. 'ABC न्यूज'तर्फे त्याचं आयोजन केलं जाईल.
या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये इस्त्राइल - हमास, रशिया - यूक्रेन युद्ध, चीन - अमेरिका संबंध, गर्भपात, बंदुकीद्वारे होणारी हिंसा, कर, महागाई, बेरोजगारी, हवामान बदल आणि घुसखोरी आदी मुद्यांवर तिखट चर्चा झाली खरी पण त्यासोबतच वैयक्तिक पातळीवरील टीकेनंही टोक गाठलं.
प्रेसिडेंशियल डिबेटसाठी हे दोन्ही नेते व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी हातात हात मिळवण्याची औपचारिकताही दाखवली नाही. बायडन यांनी ट्रम्प यांना 'हॅलो' म्हटलं पण ट्रम्प यांनी त्याला साधा प्रतिसाद देखील दिला नाही. अमेरिकेतील वाढती महागाई या मुद्यावरून या डिबेटला सुरुवात झाली.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर आपल्या वाट्याला खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था आल्याचा आरोप बायडन यांनी केला. आपण मात्र औषधांच्या वाढत्या किमतींना आळा घातला शिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली, असं बायडन म्हणाले. प्रत्युत्तरादाखल ट्रम्प यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर घुसखोर दाखल झालेत त्याचं काय, असा सवाल केला.
ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याच्या मुद्द्यावरून बायडन यांना चांगलंच घेरलं. अमेरिकन सैन्यानं तिथून परत फिरणं हे खूपच लाजिरवाणं होतं असं म्हटलं. आपण अफगानिस्तानात कितीतरी अब्ज डॉलर किमतीची लष्करी सामग्री और शस्त्रे सोडून आलो. आपले सैनिकही त्याठिकाणी मारले गेले, असंही म्हटलं.
ट्रम्प यांनी बायडन यांचा मुलगा हंटर बायडन गुन्ह्यात दोषी आढळल्याप्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यावर बायडन इतके भडकले की, त्यांनी माझा मुलगा नव्हे तुम्हीच 'लूजर' असं म्हणत ट्रम्प यांच्यावर घणाघात केला.
बायडन आपल्या कार्यकाळात देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. देशाच्या दक्षिणेकडून दरमहा मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार आणि घुसखोर देशात प्रवेश करत आहेत. मी याला 'बायडन मायग्रंट क्राइम' म्हणेन, असं ट्रम्प म्हणाले. यावर उत्तर देताना बायडन यांनी ट्रम्प खोटे आहेत आणि ते खोटं बोलत आहेत, असं म्हटलं.
देशात अमली पदार्थांचा अंमल वाढवण्यासाठी बायडन यांना चीनकडून पैसे मिळत आहेत. खरं तर ते 'मंच्युरियन' कॅन्डिडेट' आहेत, असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला. चीन आपल्याला सातत्यानं दुबळा करत चाललाय पण बायडन मात्र मग गिळून गप्प बसले आहेत.
'रशिया - युक्रेन युद्ध रोखण्यासाठी बायडन यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत उलट रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युक्रेनवर हल्ला करण्यासाठी उकसवलं. बायडन हे आतापर्यंतचे सर्वांत वाईट चीफ कमांडर असून अमेरिकन सैनिक त्यांच्यापेक्षा मला जास्त पसंत करतात.
अमेरिकेकडं असा राष्ट्राध्यक्ष असता तर पुतीन यांनी त्याचा आदर राखला असता आणि युक्रेनवर कधीच हल्ला केला नसता. इतकंच नव्हे तर हमासनंही इस्त्राइलवर हल्ला चढवला नसता. मी जर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलो तर पद स्वीकारण्यापूर्वीच रशिया - युक्रेन युद्ध थांबवून दाखवेन,' असा विश्वास ट्रम्प व्यक्त यांनी केला.
एकूणच काय तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यावर काही प्रमाणात का होईना भारी पडले, अशी चर्चा आता अमेरिकेत सुरू झालीये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.