New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका शुक्रवारपासून सुरू झाला. त्यांनी आपल्या भाषणांत काँग्रेसशासित राज्यांतील आर्थिक स्थितीवर जोरदार निशाणा साधला. या राज्यांत काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप मोदींनी केला होता. त्याला काँगेसचे नेते राहुल गांधींनीही लगेच प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधींनी शनिवारी ‘एक्स’वर पोस्ट करत मोदींच्या टीकेला उत्तर देत कर्नाटकात येऊन पाहणी करण्याचे आव्हान दिले आहे. काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही राहुल यांनी केला आहे. तसेच भाजपकडून काँग्रेसच्या योजनांवर आपले लेबल लावून इतर राज्यांत प्रचार केला जात असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला.
जुलै 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जनहिताच्या योजनांना मोफतची रेवडी म्हणत देशाला चुकीची माहिती दिली. पण त्यानंतर ते काँग्रेसच्या गॅरंटीवर आपला शिक्का मारून देशात आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकीत प्रचार करत आहेत. आणि काँग्रेसने आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे आधारहीन आरोप करत आहेत, अशी टीका राहुल यांनी केली आहे.
राहुल यांनी मोदींना आव्हानही दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदीजी, माझे आव्हान आहे, कर्नाटकात या, फिरून बघा, पडताळणी करा. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या योजनांमुळे कोट्यवधी महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे भविष्य बदलले आहे. तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातही आम्ही आश्वासने पूर्ण केली आहेत. (Mahavikas Aghadi)
आता महाराष्ट्रातही इंडिया आघाडी आपल्या पाच गॅरंटींमुळे मोठे बदल घडवणार आहे. महालक्ष्मी योजना, समानतेची हमी, कुटुंब रक्षण, कृषी समृध्दी आणि युवकांना मदत या पाच योजनांममुळे लोकांना भाजपने वाढवलेली महागाई आणि बेरोजगारीशी लढण्याची ताकद मिळेल, त्यांचे जीवनमान सुधारेल. चांगले शिक्षण आणि पोषणापर्यंत ते पोहचू शकतील, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाला अन्यायाच्या चक्रव्यूहातून मुक्त करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवेल, असेही राहुल यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील राहुल गांधींसह प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचा धडाका पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.