पणजी : गोव्यातील काँग्रेसमागे लागलेले फुटीचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. निवडणुकीपूर्वी सर्व उमेदवारांना पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवून देखील आज गोवा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि विरोधी पक्ष नेते मायकल लोबो (Michael lobo) यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीलाही ११ पैकी ७ आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर दुपारपासून घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, कामत आणि लोबो या दोघांवरही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून मायकल लोबो यांची गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांवर पक्षांतरी बंदी कायद्याच्या प्रक्रियेतून जी काही कारवाई असेल ती होणार असल्याची घोषणा गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली आहे. दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दिनेश गुंडूराव पुढे म्हणाले, आमचे किमान दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदार फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न होते. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेली रक्कम ऐकून मला धक्का बसला आहे. पण आमचे ६ आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. आता नवा नेता निवडला जाईल, अशी माहितीही राव यांनी दिली.
दरम्यान आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेमधील बंड शांत झाले असल्याचे बोलले जात आहे. कारण काँग्रेसच्या या बंडात सुरवातीला दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा या सहा आमदारांची नाव समोर आली होती. तर एका खनिज उद्योजकाच्या मध्यस्थीने आमदार आलेक्स सिक्वेरा हेही त्यांच्यात सामील झाले. मात्र युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, रुडोल्फ फेर्नांडिस व संकल्प आमोणकर या चारपैकी एकही आमदार फुटण्यास तयार नसल्याने तूर्तास हा बेत रद्द झाल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.