सिध्दूंच्या मनाचा ठाव लागेना; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेले अन् म्हणाले...

पंजाब काँग्रेसमधील वाद थांबताना दिसत नाहीत.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील (Punjab Congress) वाद थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नवज्योसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. तसेच सिध्दूंनीही राजीनामा मागे घेतला नव्हता. त्यामुळे सिध्दू पदावर राहणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर गुरूवारी दिल्लीवारीत सिध्दूंनी तलवार म्यान केली आहे.

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याशी वादानंतर पंजाब काँग्रेसमधील वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि सिध्दू यांच्यात काही मुद्यांवरून खटके उडाले आहेत. त्यानंतर सिध्दूंनी पदाचा तडकाफडकी राजीनामा देत खळबळ उडवून दिली. काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना ऊत आला. एकीकडे अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला आहे.

Navjot Singh Sidhu
समीर वानखेडेंच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल...

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर ते गुरूवारी पहिल्यांदाच दिल्लीत गेले. दिल्लीत त्यांनी पंजाब प्रभारी हरीश रावत व के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सिध्दूंनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, मी पंजाबसाठी, काँग्रेसाठी माझ्या ज्या भावना होत्या, त्या पक्षाच्या हायकमांडला सांगितल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी व राहुल गांधींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते जे निर्णय घेतील, तो पंजाबच्या हिताचा असेल. मी पहिल्यापासूनच त्यांना श्रेष्ठ मानतो आणि त्यांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करतो, असं सिध्दू यांनी स्पष्ट केलं.

रावत यांनीही सिध्दू हेच प्रदेशाध्यक्ष राहतील, अन् पक्ष संघटनेला मजबूत करतील असे सांगितले. सिध्दू यांनी पक्षाध्यक्षांचा निर्णय मान्य असेल, असे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तेच अध्यक्षपदी राहतील, हे स्पष्टच आहे. त्यांनी आता संघटनात्मक संरचनेची स्थापना करावी. याबाबत शुक्रवारी घोषणा केली जाईल, असं रावत यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना लक्ष्य केलं आहे. यामुळे नाराज झालेले चन्नी हे थेट माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या घरी गेले होते. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्यास चन्नी यांचा विरोध आहे. परंतु, कॅप्टन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे असतानाही चन्नी हे कॅप्टन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com