मुंबई : क्रुझवरील ड्रग पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून अभिनेता शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) मुलगा आर्यनला (Aryan Khan) अटक करणारे अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे.
आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. त्यानंतर पोलिसांनी वानखेडे यांची सुरक्षा वाढवली. त्यांच्या अंगरक्षकांची संख्या वाढवण्यात आली असून शस्त्रधारी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
वानखेडे यांच्या नेतृत्वाखाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकत आर्यनसह काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. शाहरूख खान व बॉलीवू़डला लक्ष्य करण्यासाठी आर्यनला अटक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप व एनसीबीने कटकारस्थान करून ही कारवाई केल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हा मुद्दा चर्चेत असतानाच वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नुकताच केला आहे. वानखेडे हे आईवर अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत नेहमी जातात. तिथेच पाळत ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना काही पुरावेही सादर केले आहेत. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे समजते. ही पाळत नेमकी कुणाकडून व कशासाठी ठेवली जात आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
दरम्यान, समीर वानखेडे हे ड्रग पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर चर्चेत आलेले नाहीत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलीवूडची ड्रग्ज मंडळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ( NCB) रडारवर आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने गेल्या एका वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. त्यानंतरही एनसीबीने अनेक धडाकेबाज कारवाया करत ड्रग्ज पेडलर्सच्या पोटात गोळा आणला आहे. सुशांतपासून शाहरुख खानच्या मुलापर्यंत समीर वानखेडे (sameer Wankhede) यांनी कोणत्याही राजकारणी किंवा सेलिब्रिटीला न जुमानता या कारवाया केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.