
Parliament News : राज्यसभेत गुरूवारी वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान दक्षिणेकडील राज्यांतील हिंदीविरोधाचा मुद्दा उपस्थित झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच दक्षिणेकडील खासदार तिरुची शिवा यांच्या कृतीचा दाखला देत ते कशाप्रकारे हिंदी गाणी गातात, याची आठवण करून दिली. त्यानंतर खासदारांनीही त्यावर भाष्य करत सभागृहातील तणावाच्या वातावरणाला बॉलीवूड टच दिला.
खासदार शिवा यांनी सभागृहात वक्फ विधेयकावर डीएमके पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी विधेयकातील अनेकर तरतुदींना कडाडून विरोध केला. या भाषणादरम्यान त्यांनी भाजपच्या सबका साथ, सबका विकास या घोषणेवरही टीका केली. यावेळी त्यांनी सबका हा शब्द उच्चारत त्यापुढे काय... अशा प्रश्नार्थक नजरेने शेजारी बसलेल्या खासदार संजय सिंह यांच्याकडे पाहिले होते. हाच मुद्दा सीतारमण यांनी लक्षात ठेवला आणि त्यांचे भाषण संपताच त्यावरून त्यांचे कान टोचले.
सीतारमण यांनी शिवा हे चांगल्याप्रकारे हिंदी गाणी गातात, याची आठवण करून दिली. ते हिदी गाणी गातात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता विकास.. सबका.. असे शब्द शोधत होते. त्यांना सबका साथ, सबका विकास... हे माहिती आहे. पण संजय सिंग शेजारी बसल्याने ते आपल्याला हिंदी चांगली येत नाही, असे दाखवत होते. ते हिंदी चित्रपटातील गाणी गातात. आमच्या भूपेंद्र यादव यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे, असे सीतारमण म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
सीतारमण यांचा हा खोचक टोला शिवा यांनीही खेळीमेळीत घेतला. याबाबत त्यांनी खुलासा केला आणि आपण गाणी कशी गातो, हे सांगितले. मी गाणी गातो, असे मान्य करत शिवा म्हणाले, इंग्रजी शब्द वाचून मी हिंदी गाणी गातो. मला गाण्यांचा अर्थ विचारला तर माहिती नसतो. समोरच्याने सांगितल्यानंतर कळतो. जेव्हा मी ‘बहारों फूल बरसाओं..’ हे गाणे गातो, तेव्हा मला त्याचा अर्थ माहिती नसतो.
आमची हिंदी बाबतची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही हिंदीच्या किंवा हिंदी बोलण्याच्या विरोधात नाही. पण राजकीय शस्त्र म्हणून त्याचा वापर होणार असेल, तर ते मान्य नाही, असेही शिवा यांनी स्पष्ट केले. या चर्चेत मग तालिका अध्यक्ष घनश्याम तिवारीही सहभागी झाले. त्यांनीही लगेच ‘मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा,’ हे शिवा यांनी गायलेले गीत ऐकल्याची आठवण सांगितली. यावेळी काही मिनिटांसाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित सर्वच सदस्यांनी या राजकीय मैफलीचा आनंद घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.