लखनऊ : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार (Nitish Kumar) हे वेगवेगळ्या नेत्यांना भेटून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते नवनवीन रणनीती आखत आहेत. आता नीतिशकुमार हे लोकसभेची आगामी निवडणूक उत्तर प्रदेशमधून (UP) लढवणार असल्याचे वृत्त आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी नीतीशकुमारांना निवडणूक लढविण्याबाबत ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. नीतिशकुमार यांनी यूपीतून निवडणूक लढवली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच त्यांच्या मतदारसंघाकडेच देशाचे लक्ष लागणार आहे. (Nitish Kumar will contest the Lok Sabha elections from Uttar Pradesh?)
नीतिश कुमार यांना उत्तर प्रदेशातील त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही जागेवरून लोकसभेची आगामी निवडणूक लढवावी, अशी ऑफर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे संपूर्ण पाठबळ त्यांच्या पाठीशी उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी यूपीच्या फुलपूरमधून निवडणूक लढवण्याची विनंती फुलपूरमधील जनता दलाच्या (युनायटेड) अनेक कार्यकर्त्यांनीही केली आहे.
जनता दलाचे (युनायटेड) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही नीतिश कुमार उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचे संकेत रविवारी दिले. ते म्हणाले की, केवळ फुलपूरमधूनच नव्हे, तर आंबेडकरनगर आणि मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातूनही नीतीशकुमार यांना निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर स्वीकारण्यासारखे किंवा नाकारण्यासारखे काही नाही. नितीश कुमार लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, हे योग्यवेळी ठरवले जाईल. परंतु, नितीश कुमार यांना आंबेडकर नगर आणि मिर्झापूर मतदारसंघामधूनही लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आलेली आहे.
ललन सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेश हे २०२४ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाचे राज्य आहे. कारण, यूपीत लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. सध्या भाजपचे उत्तर प्रदेशामध्ये ६५ खासदार असून अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांच्यासह इतर विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या जागा १५ ते २० पर्यंत कमी होऊ शकतात.
फुलपूर लोकसभा मतदारसंघाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. अलाहाबादमधील फुलपूर हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस घराण्याचा बालेकिल्ला होता. येथून पंडित जवाहरलाल नेहरू निवडणूक लढवत असत. हा मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच फुलपूर मतदारसंघाकडे विरोधकांच्या नजरा लागल्या आहेत. जेणेकरून ते थेट पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.