Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सांयकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. अपघाताचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समजू शकते.
देशातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. एक इंजिन मालगाडीच्या रॅकवरच चढले. ही टक्कर इतकी भीषण होती की खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि जवळपास 50 लोक बाहेर फेकले गेले.
अपघात झाल्यानंतर अंधारात प्रवाशी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शोधत होते. अनेक जण रडतांना, आक्रोश करीत मृतदेह, जखमी प्रवाशांना शोधत होते. यात अपघात इतका भीषण होता की मृतदेह ओळखणं कठीण जात होते, काहीचे डोके मिळाले, तर काहीचे धड मिळाले.
बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (Coromondel Express) आणि मालगाडीची (freight train) धडक झाली. यात तीन गाड्यांचा समावेश होता. बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत ४० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
रेल्वेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकही रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करताना दिसले. रुग्णालयातही अनेक लोक जखमींच्या मदतीसाठी उभे राहिले. बोगीत अडकलेल्या लहान मुलांना आणि महिलांना डब्यातून बाहेर काढण्यासाठी शिडीचा सहारा घ्यावा लागत आहे.
ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, बालासोर जिल्ह्यात 200 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत, तर ओडिशातील अग्निशमन विभागाचे महासंचालक सुधांशू सारंगी म्हणाले, "आतापर्यंत 207 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भीषण अपघातानंतर भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके आणि एनडीआरएफ, राज्य सरकारची पथके आणि हवाई दलही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बचाव कार्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत,"
बाहेरचे कोणीही मदतीला आले नव्हते..
"हात नसलेली, पाय नसलेली मृत माणसे पडलेली दिसली. तोपर्यंत बाहेरचे कोणीही मदतीला आले नव्हते. ट्रेनमधून उतरल्यावर लोक एकमेकांना मदत करत होते. चांगली गोष्ट म्हणजे आमच्या सीटखाली एक 2 वर्षाचा मुलगा होता, जो पूर्णपणे सुरक्षित होता. आम्ही त्याच्या कुटुंबाला वाचवण्यास मदत केली," असे एका प्रवासाने सांगितले.
माझा आवाज गेला ..
"सगळे सामान, प्रवासी एकमेकांवर पडले. आम्हाला श्वास घेणेही कठीण झाले होते. तरीही मी कशीबशी बाहेर पडले. माझा हात आणि मानेला दुखापत झाली आहे. मला धक्काच बसला. माझा आवाज गेला होता," असे एक महिला प्रवाशी म्हणाली.
नेमकं काय झालं..
सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सिग्नल यंत्रणेतील खराबीमुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे सांगितले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडामार्गे ओडिशापर्यंत धावते.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.