नवी दिल्ली : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) राजीनामा देणार आहेत. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील या घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) पहिल्यांदाच बोलले आहेत. त्यांनी जुनं वैर विसरून ईश्वरप्पा यांची पाठराखण करत मोठं वक्तव्य केलं आहे. (Santosh Patil Death Case News)
ईश्वरप्पा यांचा राजीनामा आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्याची जोरदार मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून येडियुरप्पा हे ईश्वरप्पा यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यात ईश्वरप्पा यांचाही मोठा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण त्यानंतरही येडियुरप्पा यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
येडियुरप्पा म्हणाले, ईश्वरप्पा यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही. ते स्वत:हून राजीनामा देत आहे. संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाचा तपास दोन ते तीन महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर त्यातून ते निर्दोष सुटतील. त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल, असं येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात येडियुरप्पा यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेसने आता आपला मोर्चा मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे वळवला आहे. सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा डाव काँग्रेसनं टाकला आहे. काँग्रेसने भाजपच्या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
काँग्रेसचं आंदोलन हे ग्रामविकास मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी नाही. ते भ्रष्टाचाराविरोधात आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की ईश्वरप्पांनी काहीही चूक केलेली नाही. त्यांनी काही चूक केली नसेल तर तुम्ही राजीनामा का घेत आहात?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivkumar) यांनी उपस्थित केला आहे. यामुळे ईश्वरप्पांच्या राजीनाम्यानंतरही मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराकडे काँग्रेसने आता लक्ष वळवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.