
India vs Pakistan : एप्रिलमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये घडवलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा तणावाचे बनले आहेत. भारताने हवाई, जल, आर्थिक, लष्करी, व्यापारी अशा प्रत्येक टप्प्यावर पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारत सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानने आतापर्यंत शक्य तितक्या साऱ्या व्यासपीठांवर जाऊन भारताविरुद्ध मदत मागितली आहे. आता "भारत आमच्यावर हल्ला करणार आहे" अशा आशयाची विधानं पाकिस्तानकडून जवळपास रोज केली जात आहेत. एकूणच पाकिस्तानची भीतीने पुरती गाळण उडाली आहे. पण पाकिस्तानची एवढी घाबरगुंडी उडण्याचं कारण आहे तरी काय?
मोदी सरकारने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले. मात्र प्रत्यक्ष लष्करी कारवाई सुरु केलेली नाही. पाकिस्तानला अशाच लष्करी कारवाईची अपेक्षा होती; पण अजून भारताने अशी पावले न उचलल्याने नेमकं काय केलं जाणार, असा संभ्रम पाकिस्तानमध्ये निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रांपासून मुस्लीम देशांच्या संघटनांपर्यंत सर्वत्र पाकिस्तानने भारताची तक्रार केली आहे. शिवाय "आमच्यावर कधीही हल्ला होईल" अशी भीतीही पाकिस्तानने अमेरिकेपासून चीनपर्यंत विविध देशांकडे व्यक्त केली आहे. 'एक-दोन दिवसांत भारत हल्ला करेल' असा दावा पाकिस्तानचे नेते गेला आठवडाभर करत आहेत.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून निरपराध नागरिकांचा जीव गेल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका स्वीकारली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सतत सीमारेषेवर गोळीबार सुरु केला. या कुरापतींना भारतीय सुरक्षा दलेही प्रत्युत्तर देतात. विशेषत: रात्रीच्याच वेळी पाकिस्तान असा गोळीबार करून हे दाखवून देत आहे की कधीही हल्ला केला तरीही आम्ही सतर्क आहोत. पण अजूनही भारताने लष्करी कारवाई सुरु न केल्याने तेथील नेतृत्त्व संभ्रमात पडले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला होता, की या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता नेमकं काय करणार, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये दोन मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. उरी व पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरही भारताने हवाई हल्ले केले होते. त्यामुळे पहलगाम हल्ल्याचाही बदला भारत घेणार, हे नक्की आहे; पण त्याचे स्वरूप अद्यापही समोर आलेले नाही आणि हेच पाकिस्तानच्या भीतीचे कारण आहे.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्करावर 18 सप्टेंबर 2016 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यात 19 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर 11 दिवसांनी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. विशेष म्हणजे भारत सरकारने प्रथमच अशा स्वरुपाच्या कारवाईचा जाहीर उल्लेख केला आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात आक्रमक धोरण स्वीकारल्याचेही दाखवून दिले.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान हुतात्मा झाले. यानंतर भारताने बालाकोट येथे एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घातला. 1971 च्या युद्धानंतर भारताने प्रथमच पाकिस्तानी सीमा ओलांडण्यासाठी हवाई दलाला परवानगी दिली होती.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केलेल्या जाहीर भाषणात दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा पलीकडची कठोर शिक्षा देण्याचा निर्धार जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सैन्य दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल एपी सिंह आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासह महत्त्वाची बैठकही झाली. यात कोणता निर्णय झाला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
भारताने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानने तीन पातळ्यांवर तयारी सुरु केली आहे. शक्य तितक्या देशांच्या प्रतिनिधींना भेटत भारताविरुद्ध तक्रारी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. चीन व तुर्कस्तानचा अपवाद वगळता इतर प्रमुख देशांनी यात फार रस दाखवलेला नाही. त्याशिवाय भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर सैन्याची जमवाजमवही सुरु करण्यात आली आहे. याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन महिन्यांचा शिधा साठवून ठेवण्यासही सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.