Haryana : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा झटका बसला. तिने 50 किलो वजनी गटात सहभाग घेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण केवळ 100 ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले. त्यावरून भारतातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
हरियाणा सरकारने विनेश फोगाटचा पदक विजेत्याप्रमाणे सन्मान केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी याबाबतची घोषणा बुधवारी केली. विनेश ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळू शकली नसली तरी ती आमच्यासाठी चॅम्पियन आहे. त्यामुळे तिला सिल्वर मेडल विजेत्यांप्रमाणे बक्षिस तसेच सर्व सुविधा दिल्या जातील, असे सैनी यांनी म्हटले आहे.
सैनी यांच्या या घोषणेवरून राजकारण सुरू झाले आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेशी सहमत नाही. विनेश अंतिम सामना खेळली असती तर सुवर्ण पदक निश्चितपणे मिळवले असते. तेवढी ती चांगली खेळत होती. त्यामुळे तिचा सुवर्ण पदक विजेत्यांप्रमाणेच सन्मान व्हायला हवा.
चौकशी व्हायला हवी
विनेश फोगाट अपात्र कशी ठरली, वजन कसे वाढले, याबाबत अनेकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे याअनुषंगाने हुडा यांनीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विनेशच्या कुटुंबियांनीही चौकशीही मागणी करत हे विनेश विरोधात षडयंत्र असल्याची टीका केली होती.
सैनी यांच्याजागी तुम्ही असता तर विनेशचा कसा सन्मान केला असता, असा प्रश्न हुडा यांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. त्यावर हुडा म्हणाले, आज राज्यसभेची जागा रिकामी आहे. माझ्याकडे बहुमत असते तर तिला राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असते.
दरम्यान, हरियाणामध्ये हुडा यांचे पुत्र दिपेंदर सिंह हुडा यांची राज्यसभेची जागा रिकामी झाली आहे. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहे. लवकरच या रिक्त जागेसाठी निवडणूक होईल. मात्र, काँग्रेसकडे आवश्यक बहुमत नसल्याने ही जागा भाजपला जाऊ शकते. हुडा यांनी विनेश फोगाटचे नाव पुढे करत भाजपची कोंडी केली आहे.
विनेशसह इतर काही कुस्तीपटूंनी मागीलवर्षी भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन केले होते. त्यानंतर सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हुडा यांचे विधान भाजप किती गांभीर्याने घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.