नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. देशातील अनेक राज्यांतून काँग्रेस हद्दपार झाल्यानंतर त्यांचा अहंकार कायम आहे, असा टोला मोदींनी लगावला. तसेच महागाईवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना थेत पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru) यांच्या काळातील महागाईचा मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण देताना मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. महागाईबाबत काँग्रेसकडून सरकारवर सतत टीका केली जाते. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना महागाईबाबत असंवेदनशील होते. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना पाण्याची बाटली विकत घेणार लोक एक रुपयाने महागाई वाढली की चर्चा करतात, असं मोदी म्हणाले.
मोदींनी नेहरूंच्या काळातील महागाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, पंडित नेहरू म्हणाले होते की, कोरियन वॉरमुळे महागाई वाढली. अमेरिकेत तणावाची स्थितीही महागाईला कारणीभूत असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी महागाईच्या मुद्दातून अंग काढून घेतलं होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मी तयारी केली आहे...
काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjab Chaudhary) यांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, कधी कधी माझ्या मनात विचार येतो. हे मी प्रेमाने म्हणतोय, नाराज होऊ नका. त्यांची वक्तव्य, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे वागणे पाहून असे वाटते की त्यांनी आपले मन बनवले आहे. ज्यापध्दतीने ते बोलतात, विविध मुद्दांना जोडतात त्यावरून असं वाटतं की, त्यांनी मन बनविले आहे. पुढील शंभर वर्ष सत्तेत यायचं नाही.
असं कुणीच करत नाही. थोडीसी आशा असते. थोडंसं वाटतं, की देशाची जनता सत्ता देईल. त्यामुळे तुम्हीच जर शंभर वर्ष सत्तेत येणार नसल्याचे ठरवलं असेल तर मीही तयारी केली आहे, असं मोदी म्हणाले. काँग्रेसची सत्तेत येण्याची इच्छा संपली आहे. पण काही मिळत नसेल तर बिघडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका मोदींनी केली. यावेळी मोदींनी कोरोनासह महागाई व इतर मुद्दयांवर विरोधकांवर शरसंधान साधले.
काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॅाकडाऊन होता. जागतीक आरोग्य संघटना आणि इतर देश लॅाकडाऊनचे समर्थन करत होते. जे लोक जिथे आहेत. त्यांनी तिथेच राहावे, असे सांगत असताना मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांना परत जाण्यासाठी मोफत तिकिट वाटले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे काम करुन काँग्रेसने आपल्यावरील जबाबदारी झटकली.
त्याच बरोबर दिल्ली सरकारनेही नागरिकांना आपल्या गावी परत जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते. मुंबई आणि दिल्लीतून गेलेल्या नागरिकांमुळे या राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. हे पाप काँग्रेसने केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, त्यावर पंतप्रधान म्हणाले मी कोणाचे नाव घेतले नाही. कोणतीही टोपी घालण्याची गरज नाही. तुम्ही उभे राहिले त्यामुळे मी नाव घेऊन बोलतो. कोरोना काळात काँग्रेसने हद्दच केली. त्यामुळे सभागृहात काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर मोदी म्हणाले काँग्रेसचे हे राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. काँग्रसेच्या या विचारामुळे संपूर्ण देश आश्चर्य चकीत झाला आहे.
अनेकांना वाटत होते की कोरोनाच्या विरोधात भारत लढु शकनार नाही. मात्र, जगातील सर्वात मोठे प्रभावी लसीकरण (Corona Vaccination) भारतात झाले. आज सगळ्या नागरिकांना पहिला डोस आणि ८० टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे. हा देश तुमचा नाही का, देशातील लोक तुमचे नाहीत का, असा सवाल पंतप्रधानांनी केला. किती राजकीय पक्षांच्या लोकांनी जनतेला सांगितले की हात धुवा, मास्क घाला. हे केले असते तर नरेंद्र मोदी यांना काय फायदा झाला असता. काही लोकांना वाटत होते की कोरोना मोदी सरकारला बदनाम करेल. या अभियानाला ताकद दिली असती तर काय झाले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.