
Delhi COVID Health Meeting : देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगानं वाढ होताना दिसत आहे. 4 जूनपर्यंत देशात 4,302 सक्रिय रुग्ण सापडले असून, गेल्या 24 तासांत 864 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यातील आरोग्य यंत्रणांना 'अलर्ट मोड'वर राहण्याबरोबर, दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
दिल्लीतील (Delhi) आपत्ती व्यवस्थापन कक्ष, इमर्जन्सी मॅनेजमेंट रिस्पॉन्स सेल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम आणि दिल्लीतील केंद्र सरकारच्या रुग्णालयांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आरोग्यसेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांमुळे घरच्या घरी उपचार घेत आहेत.
एक जानेवारीपासून आतापर्यंत कोविडमुळे (COVID) 44 मृत्यू नोंदले गेले असून, हे सर्व रुग्ण आधीपासून इतर गंभीर आजारांनी ग्रस्त होते. राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि अत्यावश्यक औषधांचा साठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन जून रोजी देशभरातील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणांवरील मॉक ड्रिल (जसे की पीएसए प्लांट्स, एलएमओ टाक्या, एमजीपीएस लाइन्स) पार पडली.
आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा पातळीवरील सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. राज्य व जिल्हा पातळीवरील 'आयडीएसपी'अंतर्गत कार्यरत सर्वेक्षण युनिट्समार्फत इन्फ्ल्यूएन्झासदृश आजार आणि तीव्र श्वसन संक्रमण यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. रुग्णालयांत दाखल सर्व रुग्णांची आणि इतर पाच टक्के रुग्णांची कोविड चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग आयसीएमआरच्या व्हायरोलॉजी प्रयोगशाळांमधून केले जात आहे.
हात वारंवार धुणे, खोकताना अन् शिंकताना योग्य शिष्टाचार पाळणे आणि आजारी असताना गर्दीपासून दूर राहणे याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्वसन लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वतःची लक्षणे तपासावी. प्रकृती बिघडल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोविड संदर्भातील अफवा व चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्या, असे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.