
Government’s Vision for Northeast Development : मागील जवळपास दोन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी (ता. 13) मणिपूरला जाणार आहेत. कुकी आणि मैतेई समाजामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये आगडोंब उसळला होता. तेव्हापासून पंतप्रधान एकदाही मणिपूरला गेलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती.
पंतप्रधान मोदींचा दौरा निश्चित झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांच्या हिंसेनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मणिपूरमध्ये पाऊल ठेवणार असल्याने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. मणिपूर हिंसाचारात 260 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो लोकांनी स्थलांतरही केले आहे. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. सरकारी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले.
मणिपूरमध्ये पंतप्रधान दोन वर्षांनंतर जाणार असून त्यासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांकडून शनिवारी मणिपूरसाठी मोठ्या घोषणाही केल्या जाऊ शकतात. तसेच कुकी समाजाची लोकसंख्या अधिक असलेल्या चुराचंदपूर भागातून ते 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास योजनांची पायाभरणी करणार आहेत. त्याचप्रमाणे मैतेई बहुल इम्फाळमध्येही सुमारे 1200 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण करणार आहेत.
चुरांदपूर येथे दुपारी 12.30 वाजता आणि दुपारी अडीच वाजता इम्फाळमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम नियोजित आहे. त्याआधी ते मिझोरामचा दौरा करणार आहेत. मणिपूरमधून ते आसामला जाणार आहेत. नंतर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही पुढील तीन दिवसांत पंतप्रधान मोदींचे दौरे होणार आहेत. मात्र, त्यांचा मणिपूर दौराच सर्वाधिक चर्चेत असणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया आली आहे. मणिपूरची समस्या खूप दिवसांपासून सुरू आहे. ते आता चाललेत हे चांगलेच आहे, असे राहुल यांनी म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. हा दौरा केवळ तीन तासांचा असेल आणि त्यामुळे तेथील लोकांचा अपमान होणार आहे. मणिपूर लोकांविषयी पंतप्रधान मोदी असंवेदनशील असल्याचे यातून दिसत असल्याचे ते म्हणाले.
कडेकोड सुरक्षाव्यवस्था
मोदींच्या दौऱ्यामुळे मणिपूर सरकारने राज्यात कडेकोड सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. चुरांदपूर येथील शांती मैदान आणि इम्फाळमधील कांगला पोर्टवर सुरक्षा यंत्रणांकडून तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना सोडण्यात येणार आहे. तसेच कोणत्या वस्तू सोबत आणू नये, याची यादीच जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.