Mumbai News, 14 Aug : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध संयुक्त लढाईचे आमंत्रण दिल्याचं सांगितलं आहे.
मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. शिवाय राहुल गांधींकडे अजूनही वेळ आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या लढाईत भागीदार होऊ शकतात. आम्हाला कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
सध्या देशभरात एकच चर्चा आहे ती म्हणजे मत चोरी झाल्याची. राहुल गांधींनी पुराव्यासहित अनेक प्रश्न उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी आयोगाने भाजपसाठी काम केल्याचा दावाही राहुल यांनी केला आहे.
याच सर्व पार्श्वभूमीवर आता वंचितनेही आयोगाविरोधात एल्गार पुकारला असून यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचं ठरवलं आहे. तर यासाठी आपण 10 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून निवडणूक घोटाळ्याविरुद्ध संयुक्त लढाईचे आमंत्रण दिले होते.
मात्र, आज 14 ऑगस्ट 2025 असून आतापर्यंत या दोन्ही नेत्यांकडू कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवाय 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततेविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी मी 16 जानेवारी 2025 रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले होते.
पण काँग्रेसने उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीच्या लढाईला पाठिंबा दिला नाही. जर ते त्याचवेळी वंचितच्या कायदेशीर लढाईत सामील झाले असते, तर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार खूप आधीच उघड झाला असता आणि भविष्यात कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही प्रकारची घोळ होण्याची शक्यता उरली नसती, असंही आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आताही राहुल गांधींना आपल्यासोबत येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. पोस्टमध्ये आंबेडकरांनी लिहिलं की, "राहुल गांधींकडे अजूनही वेळ आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या लढाईत भागीदार होऊ शकतात.
ते हस्तक्षेप अर्जाद्वारे आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणात हस्तक्षेपकर्ता बनू शकतात. आम्हाला कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे." त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांनी आयोगाविरूद्धच्या लढाईत एकत्र येण्यासाठी पुढे केलेला हात काँग्रेस हातात घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.