महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल.
तमिळनाडूचे 67 वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे 1957 रोजी तिरुपूरमध्ये झाले. वयाच्या 16 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले. ते कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 2004 ते 2007 या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेत देशाचे प्रतिनिधित्व केले.
‘तमिळनाडूचे मोदी’
दक्षिणेत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपसाठी महत्त्वाचे नेते म्हणून राधाकृष्णन यांचे नाव आघाडीवर आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2012 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावरील हल्लेखोरांना मोकाट सोडले गेल्याबद्दल त्यांनी मेट्टुपालयममध्ये निदर्शने केली होती. त्याबद्दल त्यांना अटक झाली होती. त्याआधी 1998 मध्ये कोइमतूरमधील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळविला होता. 2014 तसेच 2019 मध्ये त्यांनी लोकसभेसाठी कडवी झुंज दिली होती. अशा कामगिरीबद्दल त्यांना ‘तमिळनाडूचे मोदी’ असे संबोधले जाते
पाच वर्षांतील तिसरे राज्यपाल
राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 अशा सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे पद भूषविले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकूण 24वे राज्यपाल ठरले आहेत.
नवे राज्यपाल असे...
सी. पी. राधाकृष्णन - महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे - राजस्थान
संतोषकुमार गंगवार - झारखंड
रमण डेका - छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर - मेघालय
ओमप्रकाश माथूर - सिक्किम
गुलाबचंद कटारिया - पंजाब, चंडीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य - आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा - तेलंगण
के. कैलाशनाथन - पुदुच्चेरी (उप राज्यपाल)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बागडे ( Haribhau Bagde ) यांनी सन 1985 मध्ये तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. सन 1995 ते 1999 दरम्यान युती सरकारच्या काळात बागडे हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. बागडे यांचे राहणीमान आजही अत्यंत साधे आहे. पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोशाख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.