नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (UP) माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (SP) प्रमुख मुलायम सिंह यादव (Mulayam Singh yadav) यांचे आज (ता. १० ऑक्टोबर) सकाळी सव्वा आठच्या सुमारास गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. यादव यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भावूक झाले आहेत. त्यांनी एकापाठोपाठ अनेक फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Prime Minister Modi became emotional after the death of Mulayam Singh yadav)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुलायम सिंह यादव हे एक विलक्षण व्यक्तीमत्त्वाने संपन्न असे होते. लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असलेले एक नम्र आणि कायम जमिनीवर पाय असणारे नेते म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांनी अत्यंत चिकाटीने जनतेची सेवा केली. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि डॉ राममनोहर लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी मुलायम यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
मोदी यांनी ट्विटमध्ये पुढे असे म्हटले आहे की, आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी ते एक प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप व्यावहारिक होते आणि राष्ट्रीय हितावर त्यांनी कायम भर दिला. जेव्हा आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले तेव्हा मुलायमसिंह यादव यांच्याशी माझा अनेकदा संवाद झाला आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो. मुलायम सिंह यांच्या मृत्यूने मला वेदना होतात. यादव कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो समर्थकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो.
पहिलवान आणि शिक्षक असलेले मुलायमसिंह यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले. तसेच, त्यांनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. धाडसी राजकीय निर्णयांसाठी दिल्लीत त्यांना ओळखले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.