

Maharashtra Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ गुरूवारी (ता. 2) संपला. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे चतुर्वेदी यांना गुरूवारी निवृत्त व्हावे लागले.
राज्यसभेतील अखेरच्या दिवशी प्रियांका चतुर्वेदी यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२६ ला पाठिंबा देणारे भाषण केले. हे त्यांचे राज्यसभेतील अखेरचे भाषण ठरले. अखेरचा दिवस त्यांच्यासाठी आणखी एका भेटीने खास ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत दिली.
पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते, असे सांगत चतुर्वेदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी मला भेटून राज्यसभेतील माझा अनुभव ऐकून घेतला आणि त्यांनी त्यांचे विचारही मांडले. ही भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती.
देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याने मी विरोधी पक्षातील एक प्रभावी आवाज म्हणून पुढेही काम करत राहीन. मी देशासाठी उभी राहीन आणि देशासाठी बोलत राहीन, असा निर्धारही चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही गुरूवारी राज्यसभेत भेट झाल्याची माहिती चतुर्वेदी यांनी दिली. वैयक्तिक हानी होऊनही सुनेत्रा पवार या केवळ पक्षाचीच नाही तर राज्याची जबाबदारी सांभाळत आहेत, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचीही भेट घेतली.
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत निरोपाच्या भाषणामध्ये आपण पुन्हा येणार, असे संकेत दिले होते. त्यांनी सोशल मीडियातूनही विजयी होऊन परत येणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून चतुर्वेदी यांच्या खांद्यावर कोणती नवी जबाबदारी टाकली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.