
Congress Wins Nilambur Seat : काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियांका गांधी यांना केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पहिलं मोठं यश मिळाले आहे. त्या खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील निलांबूर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या उमेदवारासाठी प्रियांका गांधी स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या.
मुख्यमंत्री विजयन यांच्यासोबत वाद झाल्याने डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर विजयी झालेले अपक्ष आमदार पी. व्ही अन्वर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. अन्वर यांना 2021 मध्ये 2700 मतांनी निसटता विजय मिळाला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पोटनिवडणुकीत अन्वर यांनी अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांना केवळ 19 हजार 760 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत यांनी 77 हजार 737 मते मिळत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार एम. स्वराज यांचा 11 हजार 77 मतांच्या फरकाने पराभव केला. अन्वर यांच्यासाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोहन जॉर्ज हे 8 हजार 648 मतांसह चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रामुख्याने काँग्रेस, डावे आणि अपक्ष अन्वर यांच्यातच तिरंगी लढत झाली. हा मतदारसंघ प्रियांका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात येत असल्याने त्यांनीही प्रचारात लक्ष घातले होते. प्रियांका यांनी आर्यदान यांच्या प्रचारासाठी रोड शो केला होता.
प्रियांका गांधी खासदार झाल्यानंतर ही वायनाडमधील पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संपूर्ण केरळ काँग्रेसने या निवडणुकीत आपली ताकद झोकून दिली होती. प्रियांका यांच्यासह केंद्रातील अन्य काही नेतेही प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे आजचा निकाल प्रियांका यांच्यासाठी खास आहे.
या विजयानंतर प्रियांका गांधींनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. आपण एक टीम म्हणून काम केले, प्रत्येकाने झोकून देत एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केले, हा या विजयातील महत्वाचा धडा असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.