

Rahul Gandhi speech on China in Loksabha: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चौथ्या दिवशी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचं भाषण सुरु होताच, सत्ताधाऱ्यांच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात चिनी घुसखोरीसंदर्भात एका मासिकात छापून आलेल्या लेखाचा उल्लेख केला. विशेष म्हणजे हा लेख माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराबाबत आहे, त्यामुळं एकच खळबळ उडाली. पण यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सत्ताधाऱ्यांच्या खासदारांकडून आक्षेप नोंदवण्यात आला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी ४५ मिनिटे भाषण केलं. पण राहुल गांधींचं भाषण सुरु झाल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. राहुल गांधी यांनी म्हटलं की, आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करत आहोत ते पुस्तक म्हणजे माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचं आहे. पण सत्ताधाऱ्यांनी म्हटलं की असलं कुठलंही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. लोकसभेत जोरदार गोंधळ सुरु झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं की, नियम ३४९ अनुसार असं पुस्तक आणि वर्तमानपत्र सभागृहात वाचू दिलं जाणार नाही. ज्याचं सभेच्या कामकाजाशी काहीही संबंध नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं, माझी इच्छा आहे की, विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात ते पुस्तक सादर करावं ज्या पुस्तकाचा ते उल्लेख करत आहेत. कारण ते ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत ते पुस्तकच प्रकाशित झालेलं नाही.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटलं की, चार चिनी रणगाडे डोकलाममध्ये भारताच्या दिशेनं येत होते. हे रणगाडे भारतीय हद्दीपासून केवळ १०० मीटरच्या अंतरावरच होते. राहुल गांधींनी इतकंच बोलताच त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा, किरेन रिजूजी यांनी सातत्यानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला. यानंतर राहुल गांधी म्हणाले की, शेवटी सरकार कुठल्या गोष्टींना घाबरत आहे. हे घाबरलेले आहेत, मला बोलू देत नाहीत. मला हे कळतं नाही की हे म्हणतात आम्ही दहशतवादाविरोधात लढतो. पण एका कोटमुळं घाबरत आहेत. यामध्ये असं काय आहे? ज्याची तुम्हाला इतकी भीती वाटते आहे. ही जर भीती नसेल तर मला बोलू द्या. तुम्ही इतके घाबरलेले का आहात?
पण राहुल गांधींच्या भाषणाला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला. अखिलेश म्हणाले, चीनशी संबंधीत प्रकरण खूपच संवेदनशील आहे. लोकसभेत विरोधीपक्ष नेत्यांना बोलण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. यावेळी अखिलेश यांना मध्येच थांबवत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी म्हणाले की, अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे की, मासिक किंवा कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या लेखांचे कोट सभागृहात करता येणार नाहीत. सभागृहात कायदेशीररित्या चर्चा झाली पाहिजे. यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा चीन आणि जनरल नरवणे यांचा उल्लेख केल्यानंतर पुन्हा एकदा राजनाथ सिंह आणि सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. राहुल गांधींनी सभागृहाची दिशाभूल करण्याचं काम करु नये असंही ते म्हणाले.
त्यावर राहुल गांधी म्हणाले, सभागृहात चीनबाबत भाष्य करणं हे नियमांच्या विरोधात कसं काय आहे? त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, असं वाटतंय की तुम्ही हे ठरवूनच आला आहात की मुद्द्यांवर बोलायचं नाही. तुम्हाला जर बोलायचं नसेल तर मी पुढच्या वक्त्याला बोलायला परवानगी देतो. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या जागेवरुन उठले आणि म्हणाले की, सभागृहात कुठल्याही मासिकाला कोट केलं जाऊ शकत नाही. कैलाश पर्वतावर चीनी रणगाडे घुसल्याची गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? अध्यक्षांचही राहुल गांधी ऐकत नसतील ते नियमांचा भंग करत आहेत असंही अमित शहा यावेळी म्हणाले. पण सभागृहात सातत्यानं गोंधळ वाढतच असल्याचं पाहता अध्यक्षांनी दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.