नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यांनी करात कपात कमी करावी, अशी मागणी होत आहे. परंतु, केंद्राने करात कपात केल्यास राज्यांच्या करातही आपोआप कपात झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हे गणित समजावून सांगितले आहे.
अशोक गेहलोत म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आपोआप राज्यांनी लावलेला मूल्यवर्धित करही (व्हॅट) कमी होतो. कारण व्हॅट हा उत्पादन शुल्कानंतर आकारण्यात येणाऱ्या किमतीवर लावला जातो. केंद्र सरकारने पेट्रोलवरील शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील शुल्कात 10 टक्के कपात केली आहे. यामुळे आपोआप राज्याच्या व्हॅट पेट्रोलवर 1.8 रुपये आणि डिझेलवर 2.6 रुपये कमी होणार आहे. यामुळे राज्याला दरवर्षी 1 हजार 800 कोटी रुपयांचा महसुली फटका बसणार आहे. राज्यात आता पेट्रोल 6.8 रुपये आणि डिझेल 12.6 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आम्ही आधीच 29 जानेवारीला 2 टक्के व्हॅट कमी केला होता. त्यामुळे सरकारला दरवर्षी 1 हजार कोटी रुपयांचा फटका बसत आहे. आता नव्या कपातीनंतर राज्य सरकारला एकूण 2 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. यामुळे महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारनेच आणखी कपात करण्याची आवश्यकता आहे. महागाईतून जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुल्कात कपात करावी आणि त्यातून कमी होणाऱ्या व्हॅटचा बोजा उचलण्यास राज्य सरकार तयार आहे, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excis Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.