Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांची जादू चालेल की 5 वर्षांनंतर सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याचे उत्तर रविवारी म्हणजे 3 डिसेंबरला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल गुरुवारी संध्याकाळी आले. या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसची धडधड वाढली आहे, पण एक्झिट पोलनंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती भाजपच्या बालकनाथ यांची...
राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होणार, असे चित्र एक्झिट पोलमधून समोर आले आहे. या एक्झिट पोलमधून मुख्यमंत्रिपदासाठी एक असे नाव समोर आले आहे, ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. राजस्थानच्या जनतेला हे नाव परिचित आहे, पण इतर राज्यांसाठी कदाचित नवीनच असेल.
आजतक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 80 ते 100 जागा, तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही मतदारांना प्रश्न विचारण्यात आला होता. यात अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे, पण दुसऱ्या क्रमांकावर ना वसुंधरा राजे, सचिन पायलट यांचे नाव. मुख्यमंत्रिपदासाठी दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे ते महंत बालकनाथ योगी यांचे. आजतक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये बालकनाथ योगी यांना सर्व्हेत सहभागी झालेल्या 10 टक्के नागरिकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे. ( Rajasthan Election 2023 )
महंत बालकनाथ योगी हे अलवर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिजारा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांमध्ये समावेश असलेल्या बालकनाथ यांचा पोषाख हा उत्तर प्रदेशच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच आहे. यामुळे राजस्थानचा योगी म्हणून त्यांना ओळखले जाते.
अलवर आणि आजूबाजूच्या भागात बालकनाथ यांची पकड घट्ट आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यासोबतच भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्यातही ते फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थान प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, त्यावेळी त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोण आहेत महंत बालकनाथ योगी?
महंत बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 ला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुभाष यादव आणि आईचे नाव ऊर्मिला देवी आहे. ते एकुलते एक आहेत. त्यांचे आजोबा फुलचंद आणि आजी संतरो देवी या आहेत. बालकनाथ यांचे कुटुंब बऱ्याच कालावधीपासून समाजकल्याण आणि साधू संतांची सेवा करत आले आहे.
6 वर्षांचे असताना सोडले घर
बालकनाथ यांना 6 व्या वर्षीच अध्यात्माच्या शिक्षणासाठी महंत खेतानाथ यांच्याकडे पाठवले होते. महंत खेतानाथ यांनी त्यांना गुरुमख हे नाव दिले होते. शिक्षण आणि दीक्षा घेतल्यानंतर ते महंत चांद नाथ यांच्याकडे गेले. महंत चांद नाथ यांनी त्यांचे नाव बालकनाथ असे ठेवले. महंत चांद नाथ यांनी 29 जुलै 2016 ला बालकनाथ यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. महंत बालकनाथ योगी हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. ते बाबा मस्तनाथ विश्व विद्यालयाचे चान्सलरही होते.
योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच बालकनाथ हे भगवे कपडे परिधान करतात. आक्रमक भाषणांमुळे ते कायम चर्चेत असतात. बालकनाथ यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायातून येतात, त्याच नाथ संप्रदायाचे बालकनाथ हे महंत आहेत. बालकनाथ हे रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार योगी आदित्यनाथ हे अध्यक्ष, तर रोहतकच्या गदीला उपाध्यक्षाचे पद आहे. यामुळे बालकनाथ हे योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय मानले जातात.
बालकनाथ हे ओबीसी समाजातील आहेत. त्यांचे वय 39 वर्षे आहे. त्यांचे शिक्षण 12वीपर्यंत झाले आहे, अशी माहिती त्यांनी निवडणूक आयोगात उमेदवारी अर्ज दाखल करताना दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.