New Delhi : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले. तेलंगणा विधानसभेचे मतदान आज झाल्यानंतर सायंकाळी ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले. आज तक-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. त्यातही काँग्रेस राजस्थानमध्ये इतिहास बदलण्याच्या बेतात असून, भाजपपेक्षा काँग्रेसला किंचितशी आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. (Rajasthan Exit Polls 2023 : Congress-BJP clash in Rajasthan)
राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी नुकतेच मतदान झाले. येत्या ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी आज तेलंगणाचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. त्यात आज तक-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार सत्ताधारी काँग्रेसनेही भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. राजस्थानमध्ये आजपर्यंत आलटून पालटून भाजप आणि काँग्रेसचे सरकार आले आहे. मात्र, या वेळी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी बाजी मारण्याची शक्यता आहे.
आज तक-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये भाजपला ४१ टक्के, तर काँग्रेसला ४२ टक्के मतदान मिळाल्याचा अंदाज आहे. विधानसभेच्या १९९ जागा असून, त्यापैकी भाजपला ८०-१०० जागा, तर काँग्रेसला ८६ ते १०६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्व्हेनुसार राजस्थानमधील हडौती भागात भाजपला ४७ टक्के, तर काँग्रेसला ४४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. या भागात विधानसभेच्या १७ जागा असून, ११ जागा भाजपला, तर ६ जागांवर काँग्रेस जिंकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेखावटी परिसरात २१ जागा असून, या भागात भाजपला ३९ टक्के, काँग्रेसला ४२ टक्के मतदान मिळाले असल्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला १२, तर भाजपला ७ जागा, तर अन्य दोन जागांवर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. यात बहुजन पार्टीच्या एका जागेचा समावेश आहे.
अहिरवाल हा यादव, दलित आणि मुस्लिमबहुल भाग आहे. या ठिकाणी २२ जागा असून, काँग्रेसला ४० टक्के, तर भाजपला ३९ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. येथे भाजपला ९ जागा, तर काँग्रेसला १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मेवाड-गोडवाड भागात ४० टक्के मतदान भाजपला, तर ४१ टक्के मतदान काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे. या भागातील ४१ जागांपैकी २० जागा भाजप, तर १८ जागांवर काँग्रेस विजयी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा भाग आहे. मात्र, या भागात काँग्रेसला तेवढे यश ‘आज तक’च्या सर्व्हेत दिसत नाही.
जैसलमेर-बिकानेर भागात भाजप ३९ टक्के आणि काँग्रेसला ४१ मतदान झाल्याचा अंदाज आहे. या भागात १९ जागा असून, सर्वाधिक ११ जागा काँग्रेसला, तर सहा जागा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जयपूर-ढुंढाड भागात ४४ जागा असून, येथे भाजपला ४२ टक्के, काँग्रेसला ४५ टक्के मतदान झाल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. यात भागात काँग्रेस वरचढ ठरत असून, पक्षाला २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भारतीय जनता पक्षाला १७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मेवाड-वागड भागात विधानसभेच्या ३५ जागा असून, काँग्रेसला ३९ टक्के, तर भाजपला ४० टक्के मतदान मिळाल्याचा अंदाज आहे. भाजपला २० जागा, तर काँग्रेला १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.