लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपला (BJP) धक्का देऊन स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपला रामराम केला होता. आता याच मौर्य यांच्या मुलाला समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) तिकीट नाकारले आहे. यामुळे ते कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 159 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात स्वामीप्रसाद मौर्य यांच्या मुलालाच तिकीट नाकारण्यात आले आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांचे पुत्र उत्कृष्ट हे रायबरेलीमधील ऊंचाहार मतदारसंघातून इच्छुक होते. मौर्य यांनी मुलासाठी मोर्चेबांधणीही केली होती. परंतु, त्यांना आता धक्का बसला असून, मुलाचे तिकीट कापण्यात आले आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांच्या कन्या संघमित्रा या भाजपच्या खासदार आहेत. संघमित्रा यांनी भाजप सोडलेली नाही. परंतु, ते मुलाला ते समाजवादी पक्षात घेऊन गेले आहेत.
मौर्य हे त्यांचे पुत्र उत्कृष्ट यांना या विधानसभा निवडणुकीत पुढे करीत होते. परंतु, मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांच्या योजनेवर पाणी फिरल्याचे मानले जात आहे. कारण त्यांना उत्कृष्ट याची राजकीय इनिंग ऊंचाहारमधून सुरू करायची होती. ही बाब त्यांनीच बोलून दाखवली होती. समाजवादी पक्षाने तेथून मनोज पांडे यांना तिकीट दिले आहे. पांडे हे तेथील विद्यमान आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2017 मध्ये उत्कृष्ट यांचा पराभव पांडे यांनी केला होता. यामुळे समाजवादी पक्षाते अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विद्यमान आमदारालाच पसंती दिल्याचे समोर आले आहे. (Swami Prasad Maurya News Updates)
ओबीसींचे मातब्बर नेते असलेल्या मौर्य यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपला गळती लागली होती. मौर्य यांनी 11 जानेवारीला भाजपचा राजीनामा दिला होता. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. यात नंतर मंत्री दारासिंह चौहान, आमदार मुकेश वर्मा आणि मंत्री धरमसिंह सैनी यांची भर पडली होती. या सगळ्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
मौर्य हे कायम जिंकणाऱ्या पक्षात असतात, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याबाबत मौर्य म्हणाले होते की, भाजपने माझे आभार मानायला हवेत. कारण मी भाजपमध्ये आलो आणि पक्षाचा 14 वर्षांचा वनवास संपला. पक्षाला 2017 मध्ये विजय मिळाला. या विजयाच्या एक वर्ष आधी मी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये आलो होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.