
Chandigarh News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात संसदेच्या आवारात काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे आरोप-प्रत्यारोप केले जात होते. आता या दोन पक्षांचे नगरसेवक महापालिकेतच भिडल्याचे समोर आले आहे.
चंदीगड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अमित शहांच्या विधानावरून जोरदार राडा झाला. महापालिकेत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी अमित शाह यांच्याविरोधात ठराव पारित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार विरोधत केला. भाजप नगरसेवकांनी काँग्रेसनेच आंबेडकरांना अपमानित केल्याचा आरोप केला.
काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपचे नगरसेवक अनिल मसीह यांना उद्देशून चोर म्हटल्याने वाद आणखी वाढला. मसीह यांनी राहुल गांधी, संजय सिंह, अरविंद केजरीवाल हे जामीनावर जेलबाहेर असल्याचे सांगत डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस नगरसेवकाच्या हातातील पोस्टरही फाडले. त्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला आणि नगरसेवकांची धक्काबुक्की सुरू झाली.
दरम्यान, मागील आठवड्यात संसदेच्या आवारात भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमनेसामने आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी धक्का दिल्ल्याने दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणी राहुल यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राहुल यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे यांनीही आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी ज्यांना चोर म्हटले ते अनिल मसीह भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ते निवडणूक अधिकारी होते. त्यांनी आप आणि काँग्रेसच्या आठ नगरसेवकांची मते अवैध ठरवली होती. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर मसीह यांनीच जाणीवपूर्ण मतपत्रिकांमध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनीच ही कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने बाद केलेली मते वैध ठरवली होती. कोर्टातच मतमोजणी झाल्यानंतर आपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.