
Shashi Tharoor And BJP Rumors - काँग्रेस खासदार शशी थरूर यांची मागील काही दिवसांपासून भाजपसोबत जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे. शिवाय, थरूर यांच्याकडूनही मागील काही दिवसांत मोदी सरकारच्या काही निर्णयांवर स्तुतीसुमनं उधळली गेल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेली ऑपरेशन सिंदूर का महत्त्वाचं होतं आणि पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवाद्यांना पोसतोय, हे संपूर्ण जगाला सांगण्यासाठी मोदी सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळाच्या एका गटाचे नेतृत्वही शशी थरूर यांच्याकडे होतं.
त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. काहींना त्यांना भाजपचे स्टार प्रचार म्हणून हिनवण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसले. एकीकडे काँग्रेसकडून भारत-पाकिस्तान संघर्षात मोदींनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असताना, दुसरीकडे त्यांचेच खासदार शशी थरूर हे जगभरात मोदी सरकारची भूमिका ठामपणे मांडताना दिसून आले. त्यामुळेच थरूर यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याचं बोललं जात होतं, त्यात आता काँग्रेससोबत माझे काही मतभेद आहेत, असं खुद्द थरूर यांनीच सांगितल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या आधीही थरूर यांचे काँग्रेसोबतचे मतभेद अनेकदा उघड झाले आहेत.
मीडियाशी बोलताना शशी थरूर म्हणाले, मी मागील १६ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. पक्षासोबत माझे काही मतभेद आहेत आणि मी पक्षात त्याबद्दल चर्चा करेन. आज मी त्याबाबत बोलू इच्छित नाही. मला एकत्र बोलायचे आहे, वेळ येऊ द्या मग मी त्यावर चर्चा करेन.
तसेच, पंतप्रधान मोदींसोबतची चर्चा केवळ खासदारांच्या शिष्टमंडळाशी संबंधित बाबींवर होती. जेव्हा देशासाठी एखादा मुद्दा निर्माण होतो, तेव्हा देशासोबत उभा राहणे ही आपली जबाबदारी आहे, जेव्हा देशाला माझ्या सेवेचे गरज असते तेव्हा मी नेहमीच तयार असतो. असंही थरूर यांनी बोलून दाखवलं.
याआधी अनेकप्रसंगी शशी थरूर यांनी बेधडकपणे पंतप्रधान मोदींचं कौतुक केलेलं आहे. शिवाय, एस जयशंकर यांची परराष्ट्रमंत्री म्हणून आणि अश्विनी वैष्णव यांची रेल्वेमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल थरूर यांनी आनंदही व्यक्त केला होता. हे दोन्ही नेते थरूर यांचे चांगले मित्र आहेत. यानंतर थरूर यांनी मोदींच्या वेगवेगळ्या निर्णयांचे कौतुक केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.