
Lok Sabha live update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही तासांपासून सुरू होती. पण ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकत्रित येत या ‘ऑपरेशन टायगर’ हवा काढली. तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदाराने थेट काँग्रेस खासदाराला लोकसभेतच खुली ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरेंच्या पक्षातील खासदारांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत एकीची वज्रमूठ दाखवली. त्यानंतर काही तासांतच शिंदेच्या शिवसेनेने खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबईतील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. लोकसभेत बजेटवर भाषण देत असतानाच म्हस्केंनी ही ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
म्हस्के यांनी सुरूवातीला राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांना ‘कॉन मॅन’ची उपमा दिली. महायुतीची विचारधारा कॉमन मॅनसाठी असून त्यांच्यासाठी काम करत आहोत. एकीकडे कॉमन मॅन तर दुसरीकडे विरोधकांकडे कॉन मॅन आहे. खोटं बोलून, फसवून लोकांचा छळ करणारा हा कॉन मॅन कधी अभय मुद्रेत जातो. तर कधी बटाटा टाकून सोनं काढतो. कधी हलव्याला मलई म्हणतात. त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करू शकत नाही.
महिलांचा अपमान करण्याची विरोधक एकही संधी सोडत नाहीत, अशी टीका म्हस्के यांनी केल्यानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या खासदार वर्षा गायकवाड संतापलेल्या दिसल्या. त्यांनी म्हस्केंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच म्हस्केंनी त्यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. ते म्हणाले, वर्षाताईंना भाषण करण्याची कधी संधीच दिली नाही. कारण त्यांचा वशिला नाही. वर्षाताई मी तुम्हाला निमंत्रण देतो, ‘एनडीए’मध्ये या.
काँग्रेसच्या महाराष्ट्रातील इतर खासदारांना बोलताना म्हस्के म्हणाले, ज्यांनी आम्हाला रोखण्याचे षडयंत्र रचले, तेच आज पराभूत होऊन अंधारात बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय दिला आहे. विरोधकांचे तोंड काळे केले आहे. त्यामुळे तुम्ही गप्प बसा. ‘यूबीटी’वाले उद्योग गुजरातला गेले अशी टीका करतात. पण उद्योपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवले तर उद्योग महाराष्ट्रात कसे येतील, असा टोला म्हस्केंनी ठाकरेंच्या खासदारांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.