मिर्झापूर : कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील शाळा सुरू झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येही नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून काही दिवसांच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरीतील सहा वर्षांचा विद्यार्थी पाणीपुरी खायला शाळेबाहेर गेला म्हणून मुख्याध्यापकांनी त्याला शिक्षा देताना शाळेतच उलटं लटकवलं. त्यानंतर घाबरलेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील अहरौरा येथील सद्भावना शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचे व्हिडीओ व छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलीस व प्रशासनात खळबळ उडाली. मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुख्याध्यापकाला ताब्यात घेण्यात आले. यावर मुख्याध्यापकाने चूक मान्य करत माफी मागितील आहे. या घटनेनंतर मुलगा घाबरला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा मुलगा शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. तो शाळेबाहेर पाणीपुरी खाण्यासाठी गेला होता. मुख्याध्यापकांना हे समजल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी मुलाच्या एका पायाला धरून शाळेच्या इमारतीच्या गॅलरीमध्ये त्याला उलटे धरले. त्यांनी बराच वेळ मुलाला याच स्थितीत ठेवले. यादरम्यान काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ करून सोशल मीडियात टाकला.
मुलाचे वडिल रंजीत यादव यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतून मुलगा परत आल्यानंतर काहीच बोलत नव्हता. सतत रडत होता. त्याला खूप वेळा विचारल्यानंतर घटनेबाबत सांगितले. त्यानंतर त्याची तब्बेत बिघडल्याचे यादव यांनी सांगितले. हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विश्वकर्मा यांनी मात्र आपण जाणूनबुजून हे केले नसल्याचे सांगितले. रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे सांगत त्यांनी मुलासह कुटुंबाची माफी मागितली आहे. पण सामाजिक संघटनांनी मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.