तुमच वय कितीही असो, पण सर्व वयोगटातील लोकांनी आपापल्या आरोग्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. शरीरात ताकद असेल तर कोणतेही रोग होत नाही आणि रोग नसेल तर तुमच जीवनमानही सुधारतं. असे अनेकदा घरातील ज्येष्ठ आणि डॉक्टर्स (Doctors) सांगत असतात. पण अलीकडच्या काळात धकाधकीच्या आयुष्यामुळे वजन वाढण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार, हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले वजन सांभाळावे आणि वजन वाढले असेल तर ते कमी करावे. (Fitness Motivation for Female)
आज अशाच एका आयएएस अधिकारी महिलेचा लठ्ठपणा ते फिट होण्याच्या प्रवासाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या महिला अधिकाऱ्याने आपल्या व्यस्त वेळापत्रकातही स्वत:ला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला आणि वजनही सुमारे 13-14 किलोने कमी केले. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना या आयएएस महिला अधिकाऱ्याने त्यांचा फिटनेस प्रवास शेअर केला. यात विशेष बाब म्हणजे जिममध्ये न जाताही लोक आपले वजन कमी करु शकतात आणि स्वत:ला कसे फिट बनवू शकतात हे देखील सांगितले. (Sonal Goel fitness Journey)
कोण आहेत या महिला आयएएस अधिकारी
सोनल गोयल असे या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. 2008 मध्ये सोनल यांनी UPSC मध्ये ऑल इंडियामध्ये 13 वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्रिपुरामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग होती. सध्या त्या त्रिपुराभवन, दिल्ली येथे निवासी आयुक्त पदावर आहेत.
असा होता सोनल गोयल यांच्या फिटनेस प्रवास
सोनल सांगतात, निरोगी असणे प्रत्येकासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. गर्भधारणेनंतर महिलांचे वजन वाढते, जे माझ्या बाबतीतही घडले. 2009 मध्ये माझे लग्न झाले, त्यानंतर माझे वजन वाढू लागले. 2013 मध्ये जेव्हा माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी त्रिपुरामध्ये होते. गर्भधारणेनंतर तेव्हा माझे वजन खूप वाढले होते. कारण गर्भधारणा, बाळंतपण आणि हार्मोनल बदलांमुळे काही प्रमाणात वजन वाढणे स्वाभाविक होते. त्यानंतर मी हलके व्यायाम करू लागले. जुलै 2016 मध्ये माझी हरियाणा इंटर कॅडर प्रतिनियुक्तीवर पोस्टिंग करण्यात आली होती. नंतर 2017 च्या उत्तरार्धात जेव्हा माझी झज्जरमध्ये पोस्टिंग झाली तेव्हा मी घरी एरोबिक्स, झुंबा, योगासने आणि काही व्यायाम करायला सुरुवात केली. त्यामुळे व्यस्त वेळापत्रकानंतरही काही महिन्यातचं माझे 13-14 किलो वजन कमी झाले.
वजन कमी झाल्यावर मला खूप उत्साही वाटू लागले कारण मी फिट झाले होते. त्यानंतर 2018 मध्ये जेव्हा दुसरी गर्भधारणा झाली तेव्हा मी डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासने आणि व्यायाम केले. माझ्या दुस-या मुलाच्या जन्मानंतरही मी पूर्वीसारखा फिटनेस परत मिळवण्याचा निर्णय घेतला आणि अनेक प्रयत्नांनंतर, मी पुन्हा गर्भधारणेपूर्वी जशी होते तशीच फीट झाले.
फिट आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायाम
वजन कमी करणे हे माझे माझे ध्येय नव्हते तर निरोगी आयुष्य आणि फिटनेस हे होते. घरातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढणे खूप आव्हानात्मक होते. पण मला आनंद आहे की मी स्वत:ला फिट बनवू शकले. भविष्यातही मी हा प्रवास सुरूच ठेवणार आहे.
वजन कमी करण्यासाठी मी आहार घेतला नाही, पण माझ्या खाण्याच्या सवयी बदलल्या. फिट राहण्यासाठी मी माझ्या आहारातून जंक आणि फास्ट फूड काढून टाकले होते. ऑफिसच्या मिटिंगमध्ये चहा, कॉफी, स्नॅक्सचे सेवन कमी केले. घरी बनवलेला सकह आहार घेतला. याशिवाय शरीराच्या गरजेनुसार ती कोशिंबीर, मसूर, पोळी, भात खात असे. भरपूर पाणी प्यायचे. चालण्यावर भर द्यायचे आणि याशिवाय झुंबा, योगासने, प्राणायाम यांसारख्या उपक्रमांसाठी सकाळी आवर्जुन वेळ काढत असे. या माध्यमातूनच मी माझा गमावलेला फिटनेस परत मिळवला. आता मला पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटते.
प्रत्येकजण अशा प्रकारे फिट होऊ शकतो
मला आधी फिटनेसबद्दल इतके काही माहित नव्हते, पण जेव्हा मी इंटरनेटवर वाचायला सुरुवात केल्याने मला बरीच माहिती मिळाली. म्हणूनच, तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी नेहमी फिटनेस आणि आरोग्याबद्दल वाचा, असेही सोनल गोयल सांगतात. एखाद्याला काम, अभ्यास किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घराजवळील उद्यानातही फेरफटका मारता येतो किंवा वेळ मिळाल्यास घरीच एरोबिक व्यायाम करता येतो. डायटिंग करण्याऐवजी राणीचे जेवन कमी खा, तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर कमीत कमी करा आणि आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा. फक्त या सोप्या पद्धतींनी, व्यक्ती परत आपला फिटनेस मिळवू शकतो किंवा मिळवलेला फिटनेस राखू शकतो.
जो फिट असेल तर तो अधिक कार्यशील असेल आणि सर्वकाही करण्यास सक्षम असेल. त्यामुळे नेहमी तुमच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक फिटनेसकडेही लक्ष द्या. तुम्ही फिट राहिल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करू शकाल, असा सल्लाही सोनल गोयल यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.