मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असतानाही मागील तीन महिन्याचा पगार नाही. दोन वर्षांचा बोनस, ग्रॅच्युइटीही मिळालेली नाही. यामुळे एनटीसी मिल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रश्नावर आक्रमक होत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या गिरणी कामगारांनी बेलार्ट पिअर येथील प्रधान कार्यालयावर आज निदर्शन दर्शवत आंदोलन छेडले.
मागील आठवड्यात २ ऑक्टोबर रोजी देशपातळीवरील २३ 'एनटीसी' गिरण्यांतील कामगार संघटनेच्या राष्ट्रीय समन्वय कृती संमितीचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने झूम मिटिंग पार पडली होती. या मिटिंग मध्ये गिरण्यामधील कामगारांच्या थकीत पगारावर केंद्र सरकारने किंवा एनटीसी दिल्ली प्रधान प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकूण २३ गिरण्यातील जवळपास ३० हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमार ओढावली आहे. देशभरात आज एकाच वेळी त्या-त्या एनटीसी कार्यालयावर आंदोलने छेडून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. कोइंबतूर, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्यांतील एनटीसी गिरण्यांच्या कामगारांनी आंदोलन छेडले.
आमदार अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखालील मिटिंगमध्ये अहिंसक मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी झूम मिटिंग मध्ये सांगितले होते,ऐन दिवाळीत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला सनदशीर मार्गाने जाग आणावीच लागेल. आज बॅलार्ड पियर येथे संघटना नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर, तसेच नागनाथ सोनावणे, अमिजीत चव्हाण (बार्शी),मश्चिंद्र येरडावकर, रामकृष्ण बगेर (धुळे) या पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी निदर्शन आंदोलन छेडले.
मुंबईतील टाटा, इंदू क्र.५ , पोदार, दिग्विजय तसेच मुंबई बाहेरील बार्शी, धुळे, या गिरण्यातील कामगार आजच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यात महिला कामगारही सामील झाल्या होत्या. देशातील २३ एनटीसी गिरण्या लॉकडाऊनच्या कारणा खाली दि. २१ मार्च २०२० पासून बंद केल्या. त्या केंद्र सरकारने अद्याप पर्यंत चालू केल्या नाहीत. या प्रश्नावर अनेक आंदोलने छेडण्यात आली. के़द्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेट घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची पत्राद्वारे भेट मागण्यात आली आहे. सर्वच प्रयत्न उपड्या घड्यावर पाणी.. ठरलेय!
मुंबईतील एनटीसी गिरण्यांची कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असतांना गिरण्या पूर्ववत चालत का नाहीत? असा कामगारांनी सवाल करून, आता आमच्या रिकाम्या हातांना काम द्या. गिरण्या पूर्ववत चालू करा, अशी आंदोलनात मागणी करण्यात आली. एनटिसीचे कार्यकारी प्रमुख मनोज कुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांपासूनचा थकीत पगार, दोन वर्षांचा बोनस, ग्रॅच्युइटी देण्यात यावी, अशा निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या. वरीष्ठ अधिकारी किशोर पवार, दिनेश नासा या प्रसंगी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.