नवी दिल्ली : मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला आहे. तिघांनी हा पुरस्कार नाकारला असून, ते पश्चिम बंगालमधील आहेत. एकाच वेळी तीन जणांनी पद्म पुरस्कार नाकारल्याने मोदी सरकार (Modi Government) तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.
पद्म पुरस्कार नाकारण्यात आल्याने मोदी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. यात नेमकी चूक कुणाची अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पद्म पुरस्का जाहीर करण्याआधी केंद्र सरकार संबंधित व्यक्तीला दूरध्वनी करून त्याची संमती घेते. त्या व्यक्तीने संमती दिल्यानंतरच हा पुरस्कार जाहीर होतो. त्यामुळे पद्म पुरस्कार नाकारण्याचे आतापर्यंत केवळ अपवाद घडले आहेत. यावर्षी तब्बल तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारल्याने सरकारची फजिती झाली आहे.
भट्टाचार्य यांचा लगेचच नकार
पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासांत पुरस्कारच नाकारला. पुरस्कार जाहीर करण्याआधी आपल्याला कळवले नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. भट्टाचार्य हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करीत असतात.
मला नको, ज्युनिअर आर्टिस्टला द्या : संध्या मुखर्जी
याचबरोबर ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. त्या 90 वर्षांच्या आहेत. मुखर्जी यांनी हजारो बंगाली गाणी गायली असून इतरही डझनभर भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंगविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार सुरू झाल्यानंतर पहिला मान त्यांनाच मिळाला होता. त्यांनी आता पद्मश्री नाकारला असून, माझ्यापेक्षा एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टला हा सन्मान द्यावा, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. माझ्यासाठी हा सन्मान योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पद्म सन्मान नाकारणाऱ्या पश्चिम बंगालमधील त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.
पंडित अनिंद्य चटर्जी यांनीही पुरस्कार नाकारला
ज्येष्ठ तबलावादक पंडित अनिंद्य चटर्जी (Anindya Chatterjee) यांनीही पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. पंडित रविशंकर, उस्ताद अमजल अली खान आणि उस्ताद अली खान अकबर खान यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत कला सादर करणाऱ्या चटर्जी यांनी पुरस्काराला संमती दिली नव्हती. त्यांना यासाठी फोन आला त्यावेळीच त्यांनी नकार कळवला होता. राष्ट्रपती भवनात त्यांनी कला सादर केली असून, 1968 मध्ये ब्रिटनच्या संसदेतील सभागृहात कला सादर करणारे ते सर्वांत कमी वयाचे तबलावादक ठरले होते. त्यांचा 2002 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरव करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.