नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये (Ukraine) अडकून पडले आहेत. युद्धात नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मणिपूरच्या प्रचारात गुंतले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह यांच्यासोबत शहांची मेजवानी सुरू असल्याची छायाचित्रे समोर आली असून, यावरून ते ट्रोल होत आहेत. (Indian Student Killed in Ukraine)
मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. यातील पहिला टप्पा काल (28 फेब्रुवारी) झाला. आता दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. प्रचारादरम्यान, शहांनी भाजपचे उमेदवार श्यामसिंह यांच्या थौबल येथील निवासस्थानी मेजवानीला हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्यासमवेत मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेसुद्धा होते.
अमित शहांच्या या मेजवानीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावरून त्यांना ट्रोल केले जात आहे. देशातील मुले मरताहेत आणि यांना खाण्यातून वेळ मिळेना, अशी टीका एका नेटिझनने केली आहे. भारतीय युक्रेनमध्ये मरत आहेत आणि आपले सरकार आणि अमित शहा मेजवानी खाण्यात गुंग आहेत. यांचे सगळे लक्ष मणिपूरच्या निवडणुकीवर आहे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली आहे. विदेशात आपली मुले शिकायला जाणे हे आपल्या देशाच्या कमजोरीचे लक्षण आहे. सत्तालोभी सरकार आपल्या देशात चांगली शिक्षण व्यवस्था देऊ शकले नाही. शिक्षेचे महत्व गरीब व्यक्तीला कळते. पण प्रचार आणि खोट्याच्या जोरावर खुर्चीवर बसलेल्या अशिक्षित नेत्यांना शिक्षणाचे महत्व काय कळणार, अशी खंतही एका नेटिझनने व्यक्त केली आहे.
खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात नवीन शेखरप्पा (Navin Shekharappa) या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
दरम्यान, भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.