भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

अखिलेश यांनी करहल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
S P Singh Baghel, Akhilesh Yadav
S P Singh Baghel, Akhilesh YadavSarkarnama

लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) रणांगणात उतरले आहेत. त्यांनी सोमवारी करहल (Karhal) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व खासदारांना तिकीटं देण्यात आली होती. त्याचपध्दतीने आता उत्तर प्रदेशातही भाजपनं (BJP) अखिलेश यांना धक्का दिला आहे.

अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल (S. P. Singh Baghel) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. अद्याप भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी बघेल यांनी अर्ज भरल्याने त्याबाबत आता केवळ औपचारिकता उरली आहे. बघेल हे विधी खात्याचे मंत्री आहेत. ते आग्रा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

S P Singh Baghel, Akhilesh Yadav
भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे राजीनामे अन् जाळपोळ

अखिलेश यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच बघेलही अर्ज भरण्यासाठी तिथे पोहचले. त्यामुळे ही लढत आता अटीतटीची होणार अशी चर्चा आहे. करहल हा समाजवादी पक्षाचा (Samajwadi Party) गड मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून सपाच्या उमेदवाराचा या मतदारसंघात पराभव झालेला नाही. त्यामुळे बघेल यांच्यासाठीही ही लढत सोपी नसेल. पण बघेल यांचाही या भागात प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे अखिलेश यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

बघेल अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यांनी 1998, 1999 आणि 2004 मध्ये सपाच्या तिकीटावर खासदार झाले होते. त्यानंतर त्यांना सपाने पक्षातून निलंबित केले. त्यामुळे बघेल यांनी 2009 व 2014 या निवडणुका बसपाकडून लढवल्या. पण त्यांना पराभव पत्करावा लागला. या काळात ते राज्यसभेचे खासदारही होते. ते 2015 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी टुंडला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. योगी सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आग्रा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले. या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपदही मिळाले. बघेल हे आधी सपामध्येच होते. त्यामुळे थेट अखिलेश यांच्याविरोधात त्यांनी अर्ज भरल्याने प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चिन्हं आहे. अखिलेश यांच्या पराभवासाठी केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवून भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com