
Suresh Gopi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी नाराज आहे. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्री झाल्यानंतर माझे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. मला अॅक्टिंग करिअर पुन्हा सुरु करायचे आहे, असे म्हणत त्यांनी आपली नाराजीचे कारण सांगितले आणि राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली. रविवारी (13 ऑक्टोबर) कन्नूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री सुरेश गोपी म्हणाले, मला सध्या अधिक उत्पन्नाची गरज आहे. मंत्री झाल्यानंतर माझे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे अॅक्टिंग करिअर पुन्हा सुरु करायचे आहे. मी कधीही मंत्री होण्याची विनंती केली नव्हती. मी निकालानंतरही पत्रकारांना सांगितले होते की मला मंत्री व्हायचे नाही; मला चित्रपटातील माझी कारकीर्द सुरू ठेवायची आहे. पण मी केरळमधील भाजपचा पहिला जनतेतून निवडून आलेला खासदार होतो. त्यामुळे पक्षाने मला मंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सी. सदानंदन मास्टर यांची केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करावी, अशीही मागणी केली.
यापूर्वीही राजीनामा देण्याची इच्छा :
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी जून २०२४ मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. एका स्थानिक वाहिनीशी बोलताना सुरेश गोपी म्हणाले होते की, मी मी काही चित्रपट साइन केले आहेत, मला ते काम करायचे आहे. त्यामुळे केवळ त्रिशूरचे खासदार म्हणूनच काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे लवकरच मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली होती. पण लगेचच त्यांनी आपण असे काही बोललो नसल्याचे म्हंटले होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकास आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले होते.
कोण आहेत, सुरेश गोपी?
गोपी हे मल्याळम चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. १९६५ मध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९२ ते १९९५ पर्यंत त्यांनी सुपरस्टारचा टॅग मिळवला होता. १९९८ मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि केरळ राज्य पुरस्कार मिळाला.
गोपी यांनी २००८ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पण २०१६ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली. त्याचवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्त केले. २०१९ मध्ये सुरेश गोपी त्रिशूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र सुरेश गोपी यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या व्हीएस सुनीलकुमार यांचा ७४,००० मतांनी पराभव केला. आज रोजी ते केरळमधील भाजपचे जनतेतून निवडून आलेले पहिले आणि एकमेव खासदार आहेत. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मुरलीधरन या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर केरळमधील भाजपचाजनतेतून निवडून आलेला पहिला आणि एकमेव खासदार म्हणून पक्षाने त्यांची मंत्री म्हणून नियुक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.