NDA Vs INDIA: उत्तर प्रदेशात पुन्हा 'NDA'चा शोर की 'INDIA' चा जोर?

Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024: राष्ट्रीय लोक दल हा पक्ष भाजप म्हणजेच एनडीएच्या गोटात जाऊन शिरला तर समाजवादी पक्ष कॉंग्रेससोबत आघाडी करून बसला आणि उरलासुरला बहुजन समाज पक्ष मात्र स्वबळावर मैदानात उतरला. एकटा बसप ८० पैकी ७९ जागा लढवत आहे.
Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 NDA Vs INDIA News
Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 NDA Vs INDIA NewsSarkarnama

Uttar Pradesh Politics, 19 May: 'केंद्रात सत्ता स्थापनेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो,' असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. २०१९ ची लोकसभा आणि त्या पाठोपाठ २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपचा विश्वास जरी दुणावला असला तरी यावेळी काँग्रेसनं समाजवादी पक्षाशी आघाडी करून भाजपला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. मतदानाचे चार टप्पे पार पडले असून अजून तीन टप्पे बाकी आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024) २०१९ ची पुनरावृत्ती होणार की कॉंग्रेस - सपची जोडी भाजपचा गड खिळखिळा करणार याकडं आता अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

२०२४ लोकसभेसाठी भाजप देशात ४४० तर कॉंग्रेस ३२८ जागा लढवत आहे. भाजपनं ११ राज्यांत मित्रपक्षांशी युती तर कॉंग्रेसनं १५ राज्यांत आघाडी केली आहे. देशात सर्वांत जास्त लोकसभेच्या जागा असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यातील ८० जागांवर दोन्ही पक्ष युती-आघाडी करून लढत आहेत.

Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 NDA Vs INDIA News
6 Mumbai seats to vote on May 20: मुंबई कुणाची? भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसने ठाकरे सेनेसोबत आखला डाव

भाजप-कॉंग्रेस १७ जागांवर समोरासमोर!

भाजप ७५ जागांवर लढत असून उरलेल्या ०५ जागा एनडीए मधील घटक पक्षांसाठी सोडल्या आहेत. अपना दल (सोनेलाल) अर्थात AD (S) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ०२ जागा तर सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (SBSP) ०१ जागा लढवत आहे. तिकडं कॉंग्रेस केवळ १७ जागांवर लढत असून कॉंग्रेससोबत आघाडी केलेला समाजवादी पक्ष मात्र तब्बल ६२ जागा लढवत आहे. ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस (AITC) हा पक्ष जरी आघाडी सोबत असला तरी तो अवघी एक जागा लढवण्यासाठी मैदानात उतरला आहे.

२०१९ मध्ये भाजपचे ६२ तर कॉंग्रेसचा अवघा एक खासदार लोकसभेत!

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या अपना दल या पक्षाशी युती केली होती. भाजपनं ७८ तर अपना दलानं ०२ जागा लढवल्या होत्या. भाजपनं घवघवीत यश मिळवत ७८ पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या.

अपना दलानंही वाट्याला आलेल्या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर लढली होती. तब्बल ६७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते पण कॉंग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. तिकडं डाव्या पक्षांनीही कुणाशी आघाडी न करता ४१ जागा लढवल्या होत्या पण त्यांचा सुपडा साफ झाला. यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) पाच जागांवर आपलं नशीब आजमावत आहे.

बसप-सपची जोडी फुटली; सप काँग्रेस बरोबर, बसप स्वबळावर!

२०१९ मध्ये बसप - सपची जोडी होती. दोन्ही पक्षांनी अनुक्रमे ३८ आणि ३७ तर त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रीय लोक दलानं ०३ जागा लढल्या होत्या. २०१९ मध्ये 'बसप'नं १० तर 'सप'नं ०५ जागांवर विजय मिळवला होता. 'आरएलडी' मात्र भोपळाही फोडता आला नाही. २०२४ मध्ये मात्र पूर्ण चित्र बदललं. राष्ट्रीय लोक दल हा पक्ष भाजप म्हणजेच एनडीएच्या गोटात जाऊन शिरला तर समाजवादी पक्ष कॉंग्रेससोबत आघाडी करून बसला आणि उरलासुरला बहुजन समाज पक्ष मात्र स्वबळावर मैदानात उतरला. एकटा बसप ८० पैकी ७९ जागा लढवत आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेले आणि आपापल्या पक्षाचे नेतृत्व करणारे दोन्ही दिग्गज नेते अर्थात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी याच उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवत आहेत. थोडक्यात काय तर केंद्रात सत्ता स्थापनेचा मार्ग वाराणसीतून जाणार की रायबरेली इतिहास घडवणार याचा फैसला ४ जून रोजीच होणार!

Edited by: Mangesh Mahale

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com