
Jagdeep Dankhar Resigns: उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव पद सोडत असल्याचं सविस्तर पत्र त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं सुपूर्द केलं आहे. पद सोडताना त्यांनी राष्ट्रपतींसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेतील सर्व खासदार यांचे आभार मानले आहेत. तसंच उपराष्ट्रपती म्हणून अविस्मरणीय अनुभव मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या राजीनामा पत्रात उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,
आदरणीय राष्ट्रपती जी,
आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार तात्काळ प्रभावानं भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
माझ्या कार्यकाळात आपण राखलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि आमच्याशी असलेल्या शांत आणि सुंदर कार्य संबंधांबद्दल मी भारताच्या महामहिम माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो.
मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा माझ्यासाठी अमूल्य आहे आणि यातून मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो आहे.
सर्व माननीय संसद सदस्यांकडून मला मिळालेला आदर, विश्वास आणि प्रेम माझ्या स्मृतीत कायम राहील आणि माझ्या आठवणीत राहील.
आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल आणि अंतर्दृष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे.
या महत्त्वपूर्ण काळात भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हा एक विशेषाधिकार आणि समाधान आहे. आपल्या देशाच्या इतिहासाच्या या परिवर्तनकारी युगात सेवा करणे हा खरा सन्मान आहे.
या सन्माननीय पदावरून पायउतार होताना, भारताच्या जागतिक उदय आणि अभूतपूर्व कामगिरीबद्दल मला अभिमान आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यावर माझा अढळ विश्वास आहे.
आदरपूर्वक आणि कृतज्ञतेने आभार,
जगदीप धनखड हे सध्या ७४ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी झाला. राजीनामा देण्यापूर्वी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी आजवर काम पाहिलं. भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य असून यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. या काळात त्यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशासकीय कामात ढवळाढवळ केल्याप्रकरणी अनेकदा वाद झाले आहेत.
सन १९९० पासून धनखड यांनी बहुतकरुन सुप्रीम कोर्टात वकीली केली. १९८९-९१ मध्ये जनता दलाकडून राजस्थानमधील झुनझुनू लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. त्यानंतर १९९३-९८ दरम्यान राजस्थानच्या किशनगड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. तसंच राजस्थान हायकोर्टाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्षही राहिले आहेत. त्यानंतर ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. नंतर १७ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आणि ते भारताचे उपराष्ट्रपती बनले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.