

West Bengal assembly election news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदारांकडून उत्स्फूर्तपणे मतदान केले जात असून दुपारी तीन वाजेपर्यंत ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. एकीकडे छप्परफाड मतदान होत असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घटल्या आहेत. एका ठिकाणी भाजप आमदाराची गाडी फोडण्यात आली असून उमेदवारालाही मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. एका मतदान केंद्राजवळ गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत.
बंगालमधील कुमारगंज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शुभेंदु सरकार यांना स्थानिकांनी मारहाण केली आहे. सरकार यांनी हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. एका मतदान केंद्रावर जाताना या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सरकार यांना मारहाणीपासून वाचविण्यासाठी सुरक्षारक्षक रस्त्याने त्यांना घेऊन पळत असल्याचा तसेच मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे.
आसनसोलमधील भाजपच्या विद्यमान आमदार व उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवरही हल्ला झाला आहे. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. पॉल यांनी टीएमसी समर्थकांनीच हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मतदारसंघातील मतदान केंद्रांचा दौरा करत असतानाच गाडीवर मागून दगडफेक करण्यात आली. गाडीतील पॉल यांच्या सुरक्षारक्षकांना दुखापत झाल्याचे समजते. या हल्ल्यानंतर पॉल यांनी कारमध्येही डोक्यावर हेल्मेट घातले होते.
भाजपच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा तैनात असताना अशा घटना घडणे सुरक्षेमधील मोठी त्रुटी असल्याचे पॉल यांनी म्हटले आहे. या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पॉल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अग्निमित्रा पॉल या बंगालमधील प्रसिध्द नेत्या आहेत.
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एंजटवर हल्ला केल्याचा आरोप टीएमसीचे उमेदवार पवित्रा कार यांनी केला आहे. तर मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, आज बंगालमध्ये १५२ मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर २९ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्येच जोरदार लढत होत आहे. काँग्रेसनेही सर्व जागांवर उमेदवार उतरविले असले तर या निवडणुकीत पक्षाचा प्रभाव दिसला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.