Congress News : कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बिहारमधून आता राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उत्तर प्रदेशात दाखल झाली.
येथील चंदौली जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित करीत तसेच, देशाची दोन तुकड्यांमध्ये विभागणी झाल्याचा आरोपही या सभेप्रसंगी केला. यावेळी राहुल गांधींनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे नाव घेत टीका केली.
नुकताच अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहिले. अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही पाहिले. देशातील सर्व अब्जाधीश त्याठिकाणी होते. पण, आमचे आदिवासी राष्ट्रपती त्याठिकाणी उपस्थित नव्हते. कोणी शेतकरी दिसला नाही. गरीब माणूस दिसला नाही. बेरोजगारांसाठी जागा नव्हती, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली.
राहुल गांधी यांनी चंदौली येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्यात आदिवासी राष्ट्रपती आणि गरिब यांना कुणालाही जागा नव्हती. 22 जानेवारीला बडे उद्योगपती आणि सिनेतारका यांच्यासाठी रेड कार्पेट देण्यात आले होते. यातील एक टक्का हे खाजगी विमानात प्रवास करणारे आहेत. पण, जे गरीब आणि बेरोजगार आहेत त्याचे काय असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या राय एका बाजूला डान्स करताना दिसणार आहे. दुसरीकडे अमिताभ बच्चन फलंदाजी करताना दिसणार आहेत. शाहरुख खान दिसणार आहे. विराट कोहली दिसणार आहे. पण, त्यांना भूक दिसणार नाही. बेरोजगार दिसणार नाही, अग्निवीर दिसणार नाही असे राहुल गांधी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकरी आणि गरिबांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. पण, बेरोजगारी, महागाई याविषयी दिसणार नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले.बेरोजगारी आणि महागाई या दोन सर्वात मोठ्या समस्या असताना देशावर सामाजिक आणि आर्थिक अन्यायही होत आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.