Madhya Pradesh News : देशातील आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते, पण त्यापूर्वीच या पाचही राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यात मध्य प्रदेश सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. याचं कारणही तसेच आहे. मध्य प्रदेशच्या आगामी निवडणुकीत आपल्या पतीचा विजय व्हावा, यासाठी त्यांच्या पत्नीही मैदानात उतरल्या आहेत. यात खुद्द विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नी साधना चौहान, संजय शुक्ला यांच्या पत्नी अंजली शुक्ला, शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, भूपेंद्र सिंह यांच्या पत्नी सरोज भूपेंद्र सिंह आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या पत्नी आशा विजयवर्गीय यांनी प्रचाराची कमान हाती घेतली आहे.
नेत्यांच्या या पत्नी सातत्याने जनसंपर्काच्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या भेटीगाठी घेत पतीला विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या जवळपास आहे, त्यामुळे उमेदवारासोबतच त्यांच्या पत्नीही रिंगणात उतरल्या आहेत. आयोगाच्या मते, 2018 मध्ये मध्य प्रदेशातील सुमारे 42 विधानसभा जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले. अनेक जागांवर मतदानाचे अंतर ५ टक्क्यांपर्यंत होते. राजधानी भोपाळमध्ये 5 जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले.
- पतीच्या प्रचारासाठी या महिला मैदानात
अंजली शुक्ला : इंदूर विधानसभेचे आमदार आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार संजय शुक्ला यांच्या पत्नी अंजली यांनी आपल्या पतीचा प्रचार सुरू केला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शुक्ला परिवाराने इंदूरमध्ये जया किशोरी यांच्या भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
डॉली शर्मा : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आलोक शर्मा यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी डॉली शर्माही भोपाळ उत्तरमधून मैदानात उतरल्या आहेत. भोपाळ उत्तर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि आरिफ अकील सलग 5 वेळा येथून आमदार राहिले आहेत.
आशा विजयवर्गीय : इंदूर-१ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कैलाश विजयवर्गीय यांच्या पत्नी आशा विजयवर्गीय यादेखील कंबर कसून प्रचाराच्या आखाड्यात उतरल्या आहेत.आपल्या पतीला इंदूरमधून विजयी करण्यासाठी आशा विजयवर्गीय महिला मंडळाच्या बैठकींमध्ये सतत हजेरी लावत आहेत.
साधना सिंह : शिवराजसिंह चौहान यांची पत्नी साधनादेखील विदिशामध्ये सतत सक्रिय असते. भारतीय जनता पक्षाने बुधनी येथे आयोजित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेत साधना आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय नेतृत्व करताना दिसले. मात्र, या वेळी बुधनीमधून शिवराज यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही.
सरोज भूपेंद्र सिंह : लोककल्याण खात्याचे मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या पत्नी सरोज सिंह यांनीही प्रचारासाठी मैदानात उडी घेतली आहे. मात्र, भाजपने अद्याप भूपेंद्र यांना तिकीट जाहीर केलेले नाही. भूपेंद्र हे सध्या सागरच्या खुराईचे आमदार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.