बंगळूर : ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) पदयात्रेचे काम न करणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत विश्रांती देण्यात येईल, असा इशारा कर्नाटक (Karnataka) प्रदेश काँग्रेस (Congress) समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांना दिला. (Will not give tickets to MLAs who do not work for 'Bharat Jodo': D. K. Shivakumar)
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जाणार आहे. सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर हे ३ हजार ७५० किलोमीटरच अंतर चालणार आहे. तसेच, २२ मोठ्या शहरांमध्ये मेगा रॅली काढण्यात येणार आहे. त्या पादयात्रेच्या तयारीसंदर्भात शिवकुमार यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे.
आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांनी ३० सप्टेंबरला कर्नाटकात होणाऱ्या ‘भारत जोडो’ पदयात्रेसाठी कार्यकर्त्यांना पाठवण्यास नकार दिला आहे. यात्रेदरम्यान पक्षाचे काम करण्यास नकार देणाऱ्या सर्व नेत्यांना २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली जाणार नाही, असा इशारा शिवकुमार यांनी दिला. शिवकुमार यांनी या वेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांवर टीका केली आणि ते म्हणाले की पक्षात काही आमदार आहेत, जे एका दिवसाच्या कामासाठी तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे.
‘राज्यात यात्रेदरम्यान दररोज दोन आमदार हे राहुल गांधी यांच्यासोबत जोडले गेले आहेत. पुढील निवडणुकीत तुम्ही इच्छुक असाल तर काम करा. माझे किंवा सिद्धरामय्या यांचे फोटो लावू नका, तुम्ही पक्षासाठी काम करा, असेही शिवकुमार यांनी आमदार आणि नेत्यांना सुनावले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी कर्नाटकच्या यात्रेत सहभागी होतील. यात्रेदरम्यान प्रियांका गांधी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
काँग्रेसचे कर्नाटक प्रदेश कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण म्हणाले की, यावर्षी महात्मा गांधी जयंती म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुंड येथील बदनावलू गावात साजरी केली जाईल. महात्मा गांधींनी १९३२ मध्ये नंजनगुंड जवळील या ठिकाणी भेट दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.