Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या भाजपला रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकजूटीसाठी तयारी सुरू केली आहे. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही एनडीएचा जुने सदस्य परत आणण्यासाठी आणि एनडीएमधील पक्षसंख्या वाढवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. (Latest Marathi News)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपनेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला बळ वाढवणय्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एनडीएच्या माजी सहकाऱ्यांशी याबाबत बोलायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मजबूत युती करण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने कर्नाटकमधील जनता दल (सेक्युलर), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्याशी युती करण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि तामिळनाडूतील अण्णाद्रमुक यांच्याशीही पक्षाचे संबंध पक्के झाले आहेत. याशिवाय लवकरच उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांतील छोट्या पक्षांसोबत बैठका घेऊन युतीबाबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला प्रादेशिक पक्षांशी संबंध ठेवण्याचा आणि त्यांना एनडीएमध्ये सामावून घेण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांचा हा सल्ला भाजपच्या अनेक नेत्यांनी स्वीकारला आहे.
टीडीपी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, अकाली दल आणि नितीश कुमार यांचा जेडीयू एनडीएमधून बाहेर पडल्याने भाजप मित्रपक्षांशी समन्वय साधण्यात रस दाखवत नाही, अशी प्रतिमा भाजपची झाली आहे. भाजप छोट्या पक्षांशी युती करण्याच्या बाजूने नसल्याचा संदेश मधल्या काळात गेला होता, हेच चित्र आता भाजपला बदलायचे आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर, भाजप नेतृत्वाने कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून एनडीएमधून बाहेर पडलेल्या अकाली दलाशी संबंध सुधारवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या जालंधर लोकसभा जागेसाठी मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला ३४.१ टक्के मते मिळाली होती. तर, अकाली आणि भाजपच्या उमेदवारांना अनुक्रमे १७.९ टक्के आणि १५.२ टक्के मते मिळाली. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अकाली दलानेही भाजपसोबतचे संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि जेडीएस यांच्यात युती होणार असल्याची चर्चा होती. पण देवेगौडा यांचा पक्ष वोक्कलिंगा आणि मुस्लीम मते टिकवण्यासाठी ही युती पुढे सरकली नाही. त्याच वेळी मतांच्या टक्केवारीत आश्चर्यकारक घट झाल्याने भाजप निराश झाला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, "लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी औपचारिक युती करणे फायदेशीर आहे.
बालासोर रेल्वे अपघातानंतर घेतलेल्या काही निर्णयांमुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे कौतुक केले होते. त्यांच्याशिवाय जेडीएसच्या अनेक नेत्यांनीही कौतुक केले. ही विधाने भाजप आणि जेडीएसच्या युतीचे संकेत देत आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर भाजप लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वोक्कलिंगा मते आपल्या बाजूने घेण्यास उत्सुक आहे.
कर्नाटकातील पराभवानंतर भाजपने टीडीपीसोबत संबंध चांगले राखण्यास सुरुवात केली आहे. चंद्राबाबू नायडू आणि अमित शहा यांच्यात या मुद्द्यावर बैठकही झाली आहे. नायडू यांनी यापूर्वीही भाजपसोबतचे संबंध पुर्ववत करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा भाजप नेतृत्वाने रस दाखवला नाही. नायडू यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. दोन्ही बाजूंनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एकत्र काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
या वर्षअखेरीस अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. येथे भाजपची थेट लढत काँग्रेसशी होणार आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीवर मात करून आंध्र प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी, नायडू भाजपसोबत युती करण्यास उत्सुक आहेत. त्याचवेळी तेलंगणात भाजपने चंचुप्रवेश झाला आहे. भाजपला आपली स्थिती आणखी मजबूत करायची आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर रोखणे भाजपचा प्रयत्न असणार आहे.
महाराष्ट्रातील भाजपने शिंदे गटाला समेटाचे नवे संकेत पाठवले आहेत. संसदेत भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिंदेंच्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी शिंदे गट करत आहे. मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी लवकर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. शिंदे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहांची भेट घेतली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.