
Woman Sarpanch begs for a living.
Sarkarnama
नवी दिल्ली : गावचा सरपंच (Sarpanch) म्हटलं की वेगळाच रुबाब असतो. अवतीभवती कार्यकर्ते, गावातील कामांसाठीची धावपळ, बैठका, नागरिकांच्या गाठीभेटी...असा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला. याला काही अपवादही असतात. पण आतापर्यंत कोणत्याही सरपंचावर भीक मागून जगण्याची वेळ आल्याचे कधी ऐकले नव्हते. हा धक्कादायक प्रकार आता समोर आला असून बिनविरोध निवडून आलेल्या एक महिला सरंपचावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.
हेमा नायक (Hema Naik) असं या महिला सरंपचाचे नाव आहे. ओडिशा (Odisha) राज्यातील गंजम जिल्ह्यातील बडापल्ली गावच्या त्या सरपंच आहेत. गावातील घरोघरी जाऊन त्या सध्या भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या आर्थिक स्थिती दयनीय झाल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्या स्थानिक आमदारांसोबत एका कार्यक्रमात व्यासपीठावर दिसल्या होत्या. या कार्यक्रमात स्मार्ट आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले होते.
नायक या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आहेत. गावातील सरपंच पद हे या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. यावेळी केवळ नायक यांचाच एकमेक अर्ज होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. पण गावातील सर्वोच्च पद असलेले सरपंच होऊन चार वर्ष उलटले तरी त्यांच्या आर्थिक स्थितीत काहीच बदल झालेला नाही. पुढील काही महिन्यांत त्यांचा कार्यकाळही संपत आहे.
हेमा नायक यांचे पती पंचायक कार्यालयात शिपाई म्हणून काम करतात. त्यांचा मुलगाही मजूरी करतो. पण त्यांची कमाईही घर चालवण्यासाठी तोकडी पडत आहे. त्यामुळे नायक यांना घरोघरी जाऊन भीक मागण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बीडीओ (BDO) मिताली पात्रा यांनी सरपंच भीक मागत असल्याच्या प्रकाराचा इन्कार केला आहे.
पात्रा म्हणाल्या, मागील सहा महिन्यांपूर्वीच या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून आली होती. त्याचा तपास केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. सरपंचांनीच आपण भीक मागत नसल्याचे म्हटले आहे. त्या अशिक्षित असल्याने पंचायतीच्या कामात पती व मुलाची मदत घेतात. त्यांना सरपंच असल्याने दरमहा 2350 रुपये मानधन मिळते. त्यांचा पती हे मानधन घेतो. आम्ही आता एक टीम पाठवून याची अधिक माहिती घेणार आहोत. दरमहा मानधन मिळत असून त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येणं दुर्दैवी आहे, असं पात्रा म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.