
नागपूर : आयपीएस झाल्यानंतर नांदेडला पोलीस अधिक्षक होते. पुढील अभ्यास सुरुच होता. आयएएससाठी सिलेक्ट झाले होते, पण मला वर्दीचे आकर्षण आधीपासून होते आणि नांदेडच्या कारकिर्दीत ते अधिकच वाढले. त्यामुळे पोलिस म्हणून काम करण्याला प्राधान्य दिले. विविध संकटांनी त्रस्त झालेले `डिस्ट्रेस' लोक पोलिसांकडे येतात. त्यांना न्याय मिळवून देण्यात समाधान मिळते. आयपीएसचे प्रशिक्षण हे देशातील सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण आहे, असे नागपुर शहर झोन दोनच्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्त विनिता साहू `सरकारनामा'शी बोलत होत्या. विनिता साहू म्हणाल्या, की आयपीएस प्रशिक्षणाच्या सुरुवातीला 100 मीटर चालणे या प्रकारात मी दमून जात होते. पण प्रशिक्षण झाल्यानंतर 16 किलोमीटर अंतराच्या क्रॉस कंट्रीमध्ये मी प्रथम क्रमांक सहज पटकावला होता. भाषा प्रशिक्षणामध्ये मराठी शिकले आणि मराठी भाषा पुरस्कारही पटकावला. नागपुरमध्ये रुजू होण्यापूर्वी ग्रामीण भागातच काम केले. अधीक्षक म्हणून वाशीम, भंडारा, गोंदीया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काम केल्याचा अनुभव होता. शहर आणि ग्रामीण पोलिसींगमध्ये तफावत आहे. त्यामुळे नागपूरला येताना थोडे दडपण होते. कारण येथे व्हीआयपी मुव्हमेंट आहेत. विधानभवन, उच्च न्यायालय, संविधान चौक आहे. संवेदनशील प्रकरणांचे निकाल येथे लागतात. पण पोलीस आयुक्त चांगले आहेत. सर्व सहकाऱ्यांना समजून घेऊन काम करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे लवकरच नागपुरशी एकरुप झाले.
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यापक युवतीला जाळून मारल्याची घटना दुर्दैवी आहे. अशा घटना टाळण्यासाठी एकटे पोलीस काही नाही करु शकणार. त्यासाठी संवेनशील समाज घडला पाहीजे. रस्त्यावर चालताना प्रत्येकाने जागरुक असले पाहीजे. आजही अशा घटना घडताना लोक केवळ बघत राहतात आणि गुन्हेगार पळून गेल्यावर आरडाओरडा, धावपळ करतात. घटना घडताना तेथे हजर असलेल्यांनी एकत्रित होऊन गुन्हेगारांवर तुटुन पडले पाहीजे. याशिवाय शाळांमधून मुला-मुलींवर तसे संस्कार झाले पाहीजे. महीलांचा सन्मान करण्याचे धडे पालकांनीच मुलांना देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे.
महिला पोलिस अधिकाऱ्याकडून महिलांना अपेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरविले. पोलिसांत तक्रार कशी करावी, याची देखील माहिती महिलांना नसते. त्यामुळे सर्वप्रथम त्यासाठी जनजागृती केली. सप्टेबर 2019 मध्ये `जागरुक मी व समाज' हा उपक्रम राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वाकर्स स्ट्रीट आणि बगिचे असामाजिक तत्वांचे लक्ष्य असतात. त्यामुळे अशा ठिकाणी दामीनी पथकांची पेट्रोलींग वाढविली. जाफनीज गार्डन आणि फुटाळा तलावाजवळची दुकाने रात्री 2-3 वाजेपर्यंत सुरु राहायची. ती आता 11 वाजता बंद होतात. त्यामुळे अर्धे काम हलके झाले. त्यानंतर तेथे फीस्क पॉइंट बनविला. आता गुन्हेगारी आटोक्यात असल्याचे विनीता म्हणाल्या.
महिला दिनापासून शहरात येणार `पोलिस दीदी'
शहरातील महिला आणि मुलींचे आत्मबल वाढविण्यासाठी जागतिक महिला दिनी "पोलिस दीदी' उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. या दीदी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतील. याच धर्तीवर "पोलिस काका' उपक्रमसुद्धा विभागातर्फे सुरु करण्यात येणार असल्याचे विनीता यांनी सांगितले. नागपूर शहरात "भरोसा सेल' स्थापन करण्यात आले आहे. येथे महिलांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या जातात. येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. भरोसा सेलमध्ये केवल महिला अधिकारी व कर्मचारी काम करतात. या सेलमध्ये महिला समूपदेशन, विधी सल्लागार, पिडीत महिलांसाठी राहण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा, मानसोपचार तज्ञांची मदत मदत मिळवून दिली जाते. येथे महिलांना पोलिसांकडून सर्वच प्रकारची मदत केली जाते. त्यामुळे महिलांचे माहेर म्हणून "भरोसा सेल' ओळखला जातो.
पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "होम ड्रॉप' योजना सुरू केली. शहरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला रात्री नऊ वाजतानंतर घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्यास किंवा भीती वाटत असल्यास अशा मुलींना, तरूणींना महिलांना घरापर्यंत पोलिस पोहोचवून देतील. रात्रीच्या सुमारास एकट्या मुलींना भीती बाळगण्याचे कारण नाही. मुलींकडे दुचाकी जरी असली तरी दुचाकीसह घरी पोहोचवून देण्याची जबाबदारी पोलिसांची असेल. महिला सुरक्षिततेसाठी नागपूर पोलिसांनी उचललेले महत्वाचे पाऊल आहे.
महिला व मुलींसाठी टीप्स
तरूणींनी मनात भीती बाळगून समाजात वावरू नये. जेणेकरून मनात भीती नसल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होईल. पालकांनीही मुलींनाच सारखे सल्ले देऊन कमजोर बनविण्यापेक्षा तिला ब्रेव्ह बनविण्याकडे लक्ष द्यायला हवे. संकट समयी काय करावे, याबाबत मुलींना माहिती द्यावी. पोलिसांचा 100 डायल क्रमांक हा कॉंटॅक्ट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवावा. जेणेकरून संकटकाळात लगेच पोलिसांची मदत घेता येईल. रात्री उशीरा रस्त्यावरून एकटे जाणे शक्यतो टाळावे किंवा एकटे जात असताना पालक किंवा नातेवाईकांच्या संपर्कात राहावे. तसेच पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी प्रयत्न करावा. संशयित व्यक्ती किंवा पाठलाग करीत असल्याचा संशय आल्यास लगेच अलर्ट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. शाळकरी मुलीपासून ते अगदी भाजीपाला विक्री करणाऱ्यांकडे स्मार्ट फोन आहे. मात्र, स्मार्टफोन वापरण्याच्या मर्यादा प्रत्येकाने लक्षात घ्यायला हव्या. अनेक विवाहित महिला आपला अधिकाधिक वेळ वॉट्सऍप आणि फेसबूकवर घालवतात. त्यापायी मुलांकडे, पतीकडे आणि कुटूंबियांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महिलांनी मोबाईलला एवढा वेळ दिल्यापेक्षा कुटूंबियांकडे लक्ष द्यावे. तरूणींनी मोबाईलचा अतिवापर करू नये. वॉट्सऍप किंवा फेसबूकवर पर्सनल फोटो टाकण्याचा मोह टाळावा. अनेकदा हॅकर्स किंवा असामाजिक तत्व फोटोशॉपमध्ये छेडछाड करून (मॉर्फ) ब्लॅकमेल किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शक्यतोवर पर्सनल फोटो सोशल मीडियावर शेअर करू नये. जसे आपण अनोळख व्यक्ती भेटल्यास फक्त "हाय-हॅलो' पर्यंत मर्यादा ठेवतो. तसेच फेसबूकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नका. त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचता येईल.
सध्याच्या युगात मुलींनी परफेक्ट असणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणापासूनच मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायला हवे. मुलांप्रमाणे मुलींनाही खेळ आणि मैदानावर मोकळीक द्यायला हवी. मुलींना कराटे किंवा ज्युडोचे प्रशिक्षण द्यावे आहे. तसेच क्रीडा प्रकारात सहभागी होण्यास पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच संकटसमयी उपयोगासाठी मुलींनी पर्समध्ये पेपर स्प्रे, मिरची पावडर, नेल कटर ठेवण्यास काही हरकत नाही. परिस्थितीला न घाबरता दोन-दोन हात करण्याची क्षमता निर्माण होईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे.
शालेय शिक्षण घेताना मुली वयात येतात. त्यांना प्रेम आणि शारीरिक आकर्षण यामधील फरक कळत नाही. कुणीतरी माझ्याशी गोड बोलतो किंवा माझी काळजी घेतो, म्हणजे तो माझ्यावर प्रेम करतो, असा गैरसमज मुलींचा असतो. शाळकरी मुली मोठ्या तरूणींचे अनुकरण करतात. तिला बॉयफ्रेंड आहे म्हणून मलाही बॉयफ्रेंड हवा. ही भावना मुलींच्या मनातून काढून टाकायचा प्रयत्न पालकांनी करावा. लहान मुलीं लवकर जाळ्यात फसतात. त्यामुळे तरूण अल्पवयीन मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करतात, अशा घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. जेणेकरून ती सर्व गोष्टी घरी शेअर करू शकेल.
पालकांनी मुले आणि मुलींना समान लेखावे. जेणेकरून हीनभावनेची घरातूनच सुरूवात होणार नाही. मुलींना सतत उपदेशाचे डोज पाजल्यापेक्षा त्यांच्या काय समस्या आहेत, त्या प्रेमाने समजून घ्या आणि त्यावर समाधान शोधा. कुणी त्रास देत असेल तर कुटूंबातील वरिष्ठांशी नंतर पोलिसांपर्यंत पोहोचा. मुलीकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्न विचारू नका. मुलाप्रमाणे तिलाही प्रेम द्या जेणेकरून समाजात वावरताना ती गर्वाने आणि मान ताट करून वावरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.