एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्या चिंध्या झाल्या आहेत. नेत्यांची महत्त्वाकांक्षा आणि त्यातून कार्यकर्त्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
गत विधानसभा निवडणुकीपर्यंत एक-दोन जागांचा अपवाद वगळता जिल्ह्यात आमदार आणि खासदार कॉंग्रेसचेच होते. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंकेसह "गोकूळ' मध्येही कॉंग्रेसचीच सत्ता होती. माजी खासदार कै. उदयसिंहराव गायकवाड, कै. सदाशिवराव मंडलिक, माजी मंत्री कै. श्रीपतराव शिंदे, कै. दिग्विजय खानविलकर, कै. रत्नाप्पा कुंभार, कै. सा. रे. पाटील अशी एकसे बढकर एक नेते कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतरच्या काळातही कॉंग्रेसने यशवंत एकनाथ पाटील, कै. संजयसिंह गायकवाड, जयवंतराव आवळे, कै. बाबासाहेब कुपेकर यासारख्या नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. हे करत असताना या सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना कधी वाऱ्यावर सोडले नाही. पण बदलत्या राजकारणात कार्यकर्त्यांपेक्षा वारसदारांना महत्त्व प्राप्त झाले, त्यातून नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या, कार्यकर्ता दुरावत गेला आणि आज पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार नाही.
पक्षाची सत्ता महापालिकेत, जिल्हा परिषदेत व जिल्हा बॅंकेत आहे, पण ती कधी जाईल हे सांगता येत नाही. "गोकूळ' तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक किंवा "गोकूळ' असो या संस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून आहेत. पण जिल्हा बॅंकेतही आमदार, खासदार संचालक आहेत. "गोकूळ' मध्ये 40 वर्षापासून तेच चेहरे आहेत. जिल्हा परिषद नेत्यांनी मुलांची सोय लावली आहे. याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आणि बघता बघता कार्यकर्ताही आपली सोय बघून निर्णय घेऊ लागला. त्यामुळे आता कॉंग्रेस म्हटलं की जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे हीच नावे पुढे येतात. पण या चारही नेत्यांची तोंड चार दिशेला आहेत. या चौघांनी जरी ठरवले तर पक्षाला उभारी मिळू शकते, त्यातून पक्ष मजबूत होणे अवघड असले तरी अशक्य नाही एवढे निश्चित.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.