
पुणे : जो मतदारसंघ शिवसेनेचा नाही, ज्या ठिकाणी शिवसेनेने कधी निवडणूक लढवलीच नाही त्या ठिकाणी ऐनवेळेला उमेदवार उभा करून तिथे 2 लाखापेक्षा जास्त मते घेणे, ही आहे शिवसेनेच्या मावळ्यांची व त्यांच्या धडाडत्या कार्यशैलीची कमाल. या मतदारसंघात असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्यात शिरुन त्यांच्याशी पंगा घेत, व भाजपलाही अंगावर घेत शिवसेनेने लक्षणीय मते मिळवली आहेत. 2019 च्या लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला गृहित धरू नका असा शिवसेनेने भाजपला एकप्रकारे इशारा दिला आहे.
लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बरेच आरोप केले आहेत. खरेतर पालघर च्या रणसंग्रामात उतरणे शिवसेनेला आवश्यक नव्हते कारण इथली निवडणूक जिंकली असती तरी त्या उमेदवाराला जो कार्यकाळ मिळणार आहे तो अवघा एक वर्षाचाच आहे. त्यामुळे ही निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची करण्याची शिवसेनेला गरज नव्हती असेच कुणीही म्हणेल, कागदावरचे गणित तर कुणीही असेच मांडेल. मात्र ठाकरे यांनी ही निवडणूक ज्या कारणासाठी प्रतिष्ठेची केली त्याला पार्श्वभूमी आहे ती लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीची. आजची निवडणूक ही लिटमस टेस्ट होती ती उद्याच्या निवडणुकीची. शिवसेनेने या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरून भाजपवरचा आपला दबाव वाढवला आहे. गेल्या चार वर्षात भाजपकडून शिवसेनेचा जितका अपमान झाला त्याचे शिवसेना उट्टे काढणार आहे, ही निवडणूक त्याची सुरवात आहे. भाजपची गेल्या निवडणुकीतील मतांची लाखाची आघाडी या निवडणुकीत अत्यंत कमी झाली आहे. या पट्ट्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे पालघर भागातील बरीच जमीन या प्रकल्पात जाणार आहे, या कामाला स्थानिकांचा विरोध आहे शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध करून या मतदारांची सहानुभूती आणि मते मिळवली आहेत.
पालघरमध्ये शिवसेनेने वनगा यांना उमेदवारी देऊन पहिली चतुराई दाखविली आणि त्यानंतर अत्यंत कमी वेळात नियोजनबद्ध रितीने या भागात शिवसेनेने आपले चिन्ह पोहचवले आणि विजयाच्या जवळपास जाण्याची किमया केली. मागील विधानसभेच्या निवडणुकीत अचानक युती तुटल्यामुळे शिवसेनेला उमेदवार उभे करण्यासाठी धावाधाव करावी लागली होती.
विधानसभेला बसलेल्या अचानक धक्क्यामुळे आता शिवसेना राज्यातील 48 च्या 48 जागा लढवण्याची तयारी करत आहे, त्यातूनच भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांच्या जागी शिवसेनेने आपले उमेदवार उभे करण्यासाठी आपल्या अनेक महत्वाच्या नेत्यांना तयारी करण्यास सांगितले आहे तसेच त्यांना बळ दिले आहे.
कर्नाटकचा अनुभव लक्षात घेतला आणि भाजपचे मित्रपक्ष त्या पक्षाला ज्या पद्धतीने सोडून जात आहेत ते लक्षात घेतले तर 2019 च्या निवडणुकीत भाजपलाच सर्वाधिक मित्रपक्षांची गरज आहे, याचाच दुसरा अर्थ जागावाटपात शिवसेना आपली ताकद दाखवून आपल्याला जास्त जागा मागेल यात शंका नाही. या ताकद दाखवण्याचा श्रीगणेशा पालघर मतदारसंघात हारूनही दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन शिवसेने केला आहे यात शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.