जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपत  K 'फॅक्‍टर' ठरणार महत्वाचा !

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला एका "डी' फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे.
sangli-ZP
sangli-ZP

सांगली :  जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपला पापड बेलावे लागणार, हे निश्‍चित आहे. सत्तासमीकरण जुळवून आणताना पक्षांतर्गत गटबाजीला रोखणे, आपले 26 मजबूत ठेवणे, यावरही काम करावे लागणार आहे. या साऱ्यात एक विषय मात्र चर्चेत आहे, तो म्हणजे अध्यक्षपदाच्या दावेदारांचा K "फॅक्‍टर'... !

कारण, भाजपच्या पाचपैकी चार सदस्यांचे आडनाव "के' या इंग्रजी अक्षराने सुरू होते आणि ज्या गटाचा या पदावर दावा आहे, त्या नेत्याचे नावही 'के'नेच सुरू होते. त्यामुळे खुर्चीसाठी कुणाचा 'के' भारी ठरणार, याची आता खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्याची आकडेवारी पाहता भाजपसाठी सत्ता कायम राखणे, इतके सहज सोपे नक्कीच नाही. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा महाविकास आघाडी पॅटर्न जिल्हा परिषदांमध्येही कायम रहावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. 

कॉंग्रेसने याचे अधिकार राज्यातील नेत्यांना दिल्याचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीची गणिते जुळू नयेत, यासाठी भाजपला हुशारीने डावपेच खेळावे लागणार आहेत. 

त्यात भाजपतर्फे अध्यक्षपदाच्या पाचपैकी चार दावेदारांची आडनावे 'के'ने सुरू होतात. त्यात प्राजक्ता कोरे (म्हैसाळ), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (हरिपूर) आणि ऍड. शांता कनुंजे (तडसर) यांचा समावेश आहे. पाचव्या इच्छुक अश्‍विनी पाटील आहेत, त्या कडेगाव मतदार संघातील आहेत, त्यामुळे तेथेही हा फॅक्‍टर लागू होतो.

विशेष बाब म्हणजे यावेळी अध्यक्षपदावर मिरज तालुक्‍याचा दावा असणार आहे आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या गटाकडे ती संधी जाणार आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे खाडे यांचा 'के' फॅक्‍टरही आलाच. हे सारेच 'कमळ' चिन्हावर निवडून आल्याने 'पार्टी वुईथ डिफरन्स'चा मान ठेवत खळखळ न करता निर्णय घेतील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


कॉंग्रेसला D "फॅक्‍टर'चा झटका?

जिल्हा परिषदेत धक्कादायक पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला एका "डी' फॅक्‍टरचा झटका बसण्याची मोठी भीती आहे. तो म्हणजे शिराळ्याच्या देशमुख यांचा. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसची एक जागा कमी झालीच, शिवाय सध्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या शारदा पाटील (पणुंब्रे वारुण) या अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील, असा विश्‍वास विरोधकांना वाटतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com