MLA Kishore Patil Fitness: नियमित व्यायाम, योगासनांनी पन्नाशीतही ‘फिटनेस’ कायम!

Pachora Assembly Constituency MLA Kishore Patil Fitness Funda: नेत्यांचा फिटनेस: संघर्ष, तणावपूर्ण जीवनातही किशोरआप्पांच्या शरीरावर अथवा चेहऱ्यावर थकवा अजिबातच जाणवत नाही. त्यासाठी त्यांची दररोजची दिनचर्या महत्त्वाची ठरते.
 MLA Kishore Patil Fitness Funda
MLA Kishore Patil Fitness FundaSarkarnama
Published on
Updated on

पोलिस सेवेतून समाजकारणात व पुढे पर्यायाने राजकारणात उतरलेले पाचोऱ्याचे (जि. जळगाव) आमदार किशोर पाटील वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही अगदी तरुणच दिसतात. उंचपुरे शरीर, मोजली तर अगदी ५६ इंचाचीच छाती भरेल अशी पीळदार शरीरयष्टी.

अनेक किलोमीटर सहज पायी चालून जातील, पण थकव्याचा लवलेशही नाही. असा स्टॅमिना. तंदुरुस्तीच्या प्रत्येक स्तरावर, निकषावर पात्र ठरतील, असा किशोरआप्पांचा फिटनेस. अर्थात, या तंदुरुस्तीसाठी त्यांनी पोलिस सेवेत दाखल होण्याच्या आधीपासूनच आपल्या शरीराला आकार देणे सुरू केले. नियमित मॉर्निंग वॉक, प्राणायाम- योगासने, व्यायामावर भर देत त्यांनी हा फिटनेस आजही कायम ठेवलाय..

जळगाव जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सर्वाधिक तंदुरुस्त व रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून किशोर पाटलांकडे पाहिले जाते. गेल्या २५ वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. त्याआधी ते पोलिस सेवेत होते. पोलिस सेवेतून बाहेर पडत त्यांनी समाजकारणाचा वसा घेतला व अनेक वर्षांपासून तो जपला. समाजकारण करताना त्यांनी लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या अडीअडचणी, समस्या समजून घेत काम सुरु केले. त्यातूनच ते राजकारणात आले. राजकारणात आल्यानंतरही सुरवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला.. मात्र, आता गेल्या तीन टर्मपासून ते पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत.

एकीकडे राजकारणात स्थिरस्थावर होत असताना दुसरीकडे त्यांच्यामागचा कामाचा व्याप, लोकसंपर्कामुळे कामाची व्यस्तता प्रचंड वाढली. अशा व्यापात अनेकदा तणावाचे प्रसंगही समोर आलेत आणि आजही ते येताहेत. परंतु, या संघर्ष, तणावपूर्ण जीवनातही किशोरआप्पांच्या शरीरावर अथवा चेहऱ्यावर थकवा अजिबातच जाणवत नाही. त्यासाठी त्यांची दररोजची दिनचर्या महत्त्वाची ठरते.

सकाळचे दोन तास स्वत:साठी

रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटे उठून सकाळचे दोन तास स्वत:साठी देण्याचे त्यांनी ठरवलेय. साडेपाच- सहा वाजेच्या सुमारास उठून सकाळी मैदानावर ‘मॉर्निंग वॉक’साठी ते नियमित जातात. तासभर चालल्यानंतर काही योगासने, प्राणायामवर भर दिला जातो. तणावमुक्तीसाठी अनुलोम- विलोम अत्यंत उपयुक्त योगाभ्यास आहे, त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून हा प्रकार प्रत्येकानेच केला पाहिजे, असा सल्लाही देत देतात. शीर्षासन, दंड- बैठकांचे सत्रही पार पडते. त्यातून शरीर, अंगकाठी मजबूत बनते. आपल्यातील काम करण्याची क्षमता वाढते, असा त्यांचा ठाम समज आहे.

 MLA Kishore Patil Fitness Funda
Gokul Dairy Election 2026: 'गोकुळ'चे दूध 'तापणार'; आतापासून 'उकळी' फुटण्यास सुरवात

सोबत अनेकांना लागली सवय

पाचोरा मतदारसंघातील अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. आप्पा मॉर्निंग वॉक, व्यायामासाठी मैदानावर गेल्यानंतर त्यांच्याशी विविध कामांसाठी चर्चा करण्यासाठी अनेक तरुणही मैदानावर पोहोचतात. मतदारसंघातील आपली कामे सांगण्याच्या ओघात चालणेही होते, व्यायामही होऊन जातो. या दिनचर्येतून मतदारसंघातील अनेक तरुणांना व्यायामाची आपसूकच सवय लागल्याचे सांगतात.

बाहेरचे खाणे टाळणेच योग्य

सकाळी दोन तास व्यायाम होऊन स्नान करुन, शुचिर्भूत झाल्यानंतर पौष्टिक नाश्‍ता घेतात. बाहेरचे खाणे कटाक्षाने टाळले जाते. दौरा, प्रवास असेल तरीही दुपारचे जेवण घरातलेच असावे, असा त्यांचा भर असतो. घरुन नाहीच शक्य झाले तर प्रवासात, मतदारसंघात एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेतात. सुरवातीला शाकाहारी असलेल्या पाटलांना कोरोना काळात मांसाहार करण्याची सवय लागली. पण, त्यातही ते मर्यादित स्वरुपातच मांसाहार करतात.

 MLA Kishore Patil Fitness Funda
Vice President News: भाजपची खेळी! उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन हेच उमेदवार का? RSS, दक्षिण भारत, अन् सामाजिक समीकरण..

लोकसंपर्कातून मिळते ऊर्जा

आमदार म्हणून पाटलांचा दरबार भरतो. मतदारसंघातील प्रत्येक घटकांतील नागरिकांना ते भेटतात. दररोज सकाळच्या सत्रात दोनशे ते अडीचशे लोक त्यांना विविध प्रश्‍न, कामे आणि समस्यांच्या संदर्भात भेटत असतात. त्या प्रत्येकाचेच समाधान करण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात. नंतर मतदारसंघातील प्रवास, दौरा अथवा कुठे काही कार्यक्रम असेल तर त्याला हजेरी लावण्याचा सिलसिला सुरु होतो.

सायंकाळी लवकर घरी पोहोचले तर पुन्हा एखादा दरबार; म्हणजे लोकसंपर्काच सत्र भरते. या लोकांच्या दरबाराला, भेटण्याला आप्पा ‘ओपीडी’ म्हणतात. लोकांशी बोलून, त्यांची कामे करुन, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी त्यांची भावना. नित्यनेमाने व्यायामातून शरीराचा, योगासनांमधून शरीरासह मनस्वास्थ्याचा व्यायाम होतोय तर लोकसंपर्कातून ऊर्जा निर्माण होते, ती पुढच्या वाटचालीसाठी कामी येते असे आप्पा आवर्जून सांगतात.

(शब्दांकन : सचिन जोशी, जळगाव)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com