Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली. ईडीने ही कारवाई केली तेव्हा रोहित पवार परदेशात होते. ते शनिवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रोहित पवारांनी ईडी कारवाईवरुन अजित पवार गटाकडे बोट दाखवले होते.
यावेळी पत्रकारांनी रोहित पवार यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता यावर अजित पवार म्हणाले, रोहित अजून बच्चा आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. यापूर्वी माझ्यावर कारवाई झाली आहे. माझ्याही 22 ठिकाणी कारवाई झाली होती हे तुम्हाला माहिती आहे का? शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्ता संस्थांना आहे, असे अजित पवार म्हणाले.
पिंपरी येथे असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मीडियाशी संवाद साधला. शुक्रवारी पुण्यात कायदा सुव्यवस्थेसंदर्भात घटना घडली होती. परंतु पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक केली. विशेषतः पोलिसांनी आरोपीना २४ तासात ताब्यात घेतले. यासंदर्भातली सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल, असे अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रोला निधी मिळाला नाही, ही बातमी खोटी आहे. पिंपरी चिंचवडला दोन रिंगरोड करत आहोत. एक आऊटर आणि एक इनर असेल. त्याशिवाय १२ जानेवारी रोजी पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत. ४६ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही
याबाबत पिंपरीत मीडियाशी बोलताना अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत 'मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही', रोहित पवारांच्या आरोपांना पक्षाचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते प्रतिक्रिया देतील, असे सांगितले.
यावेळी आणखी एका पत्रकाराने अजित पवारांना रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी “मी तुम्हाला मागेच सांगितलं ना, मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली. “काम करणाऱ्या संस्थांनी त्यांचं काम केलं पाहिजे. त्यांनी त्यांची जबाबदारी योग्यपणे पार पाडली नाही तर त्यांच्याविरोधात PIL दाखल करता येऊ शकते. आम्ही हे लक्षात आणून देतो तरी हे म्हणावं तसं लक्ष देत नाही”, असं अजित पवारांनी सांगितलं.
(Edited by Sachin Waghmare)