

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून, याबरोबर राज्यातील इतर संताच्या पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आज पर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये समावेश करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. जिल्ह्यात अधिकाधिक रस्ते निर्माण करण्यात यावेत, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने येत्या मंगळवारी (ता. १६ जून) नागपूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे नागपूरमधील आंदोलनात सहभागी होणार आहे. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीचा अर्जही नागपूर पोलिसांकडे देण्यात आलेला आहे.
गुटखा प्रकरणात जे आरोपी सापडतील, त्यांच्यावर मकोका लावण्याचे आदेश मी आज दिले आहेत. तसेच, विक्रेते, पुरवठादार आणि उत्पादकांनाही मकोकाच्या कचट्यात आणले जाणार आहे, असेही अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदारांच्या गटाची येत्या रविवारी (ता. १४ जून) दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हेही उपस्थित राहणार आहेत. या गटाची सोमवारी लोकसभा अध्यक्षांसोबत भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धाराशिव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडला. त्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर हे गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. काम असेल म्हणून ओमराजे आले नसतील, असे दानवे यांनी या वेळी सांगितले. आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी हे मात्र या वेळी उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवरून राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसला ठणकावलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव याआधीच आला होता,असं म्हटलं होतं. यावर शशिकांत शिंदे यांनी नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, स्वतःचा पक्ष मजबूत करावा आणि राष्ट्रवादीची काळजी करण्याची गरज नाही, असा खोचक टोला लगावला आहे.
पुण्यातील आयटी क्षेत्र असलेल्या हिंजवडीमधून एक हादरवणारी घटना 2 जून रोजी समोर आली होती. 48 वर्षीय इंजिनिअर असलेल्या अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या घटनेमागे कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारण असल्याचं बोललं जात आहे. पण आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या 2 पानांच्या सुसाईड नोटमध्ये कंपनीच्या ऑफिसमधलं वरिष्ठांकडून होत असलेला मानसिक छळ, वारंवार अपमान, कामाचा ताण आणि मित्राने केलेली बदनामी याला वैतागून टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख नोटमध्ये आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासह देशभारत सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलिनिकरणाच्या चर्चांवर भाष्य केलं. ते म्हणाले, काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. या बुडत्या जहाजात ते पाय ठेवतील असं मला वाटत नाही. पण त्यांनी जर पाय ठेवला, तर त्याचा आम्हाला फायदाच होणार आहे. कारण जेवढा विरोधी पक्ष मागे हटणार, तेवढी अतिरिक्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी, कृषी धोरणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत त्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच दिला असल्याचा दावा केला आहे. हा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे ते म्हणाले आहेत.
सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका फेटाळली आहे. त्या मध्य प्रदेशातून काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार होत्या. पण गुन्हेगारीविषयक माहिती उमेदवारी अर्ज नमूद न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचे मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे.
काँग्रेस बुडते जहाज आहे. त्यामुळे इतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. बुडत्या बोटीत कोणी पाय ठेवणार नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले तर आम्हाला फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. काँग्रेसमधून फुटलेले पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांची माहिती दिली. गेल्या १२ वर्षात देशात सुशासन आणि सुप्रशासन निर्माण झाले. जगात सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था भारताची बनली. मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला. मोदींना ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारताच्या नेतृत्वावर अनेक देशांचा विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अत्यंत कमी वेतन आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून चंद्रपूर आगारातील 'ग्रीन ई-मोबिलिटी एलएलपी' कंपनीच्या ईव्ही (EV) बसचालकांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे
माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित बाजूचे नोजल बंद असल्याने कर्मचाऱ्याने दुचाकी दुसऱ्या बाजूने आणण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी कर्मचाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधातील तक्रारी घेऊन नाना पटोले हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या माघारी, पक्षांतर्गत नाराजीबाबत पटोलेंकडून दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता.
हार्बर मार्गावरील अप लाईनवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक खोळंबली आहे. चेंबूर स्थानकाजवळ बिघाड झाल्याची माहिती असून सकाळी 9.10 वाजल्यापासून रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
इराणबाबत सुरू असलेल्या चर्चांना इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्बहल्ले रद्द केल्याची घोषणा केली. संबंधित सर्व पक्षांमध्ये कराराच्या प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी सांगितले की, इराणशी संबंधित चर्चा सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्या असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून नियोजित लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या. यावेळी नी राजकीय भाष्य केलं. "प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा उल्लेख केला. सर्व अधिकारी वर्ग आता चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीचा सुस्तपणा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तसेच, प्रत्येक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो आणि काही राजकारणीही सुद्धा त्याला अपवाद नाहीत. राजकारणी सुद्धा नालायक आहेत, सगळे राजकारणी काही शुद्ध दुधासारखे नाही," असे स्पष्ट वक्तव्य नाईक यांनी केलं.
जळगावमध्ये विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या अनुक्रमांकांबाबत शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे सेनेचे उमेदवार शरद तायडे यांच्यासह जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची याबाबत भेट घेतली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराचा अनुक्रमांक ठरवताना राष्ट्रीय पक्ष , प्रादेशिक पक्ष त्यानंतर अपक्ष अशी रचना हवी होती, असं शिवसेना ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटलं आहे. आतापर्यंतच्या निवडणुका या अशाच पद्धतीने झाल्या आहेत. मात्र या निवडणुकीत मुळाक्षरानुसार उमेदवाराचे अनुक्रमांक ठरतात, असे उत्तर प्रशासनाकडून शिवसेना ठाकरे सेनेला देण्यात आले आहे. या मुळे निवडणूक प्रक्रियेत शंका उपस्थितीत होऊ लागली आहे.
नाशिक पाठोपाठ जळगावमधील देखील महायुतीमधी बंडखोरीचा प्रश्न सुटण्याची चित्र आहे. जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील बंडखोर उमेदवारांची माघार घेण्यासंदर्भातील घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः याबाबत लवकर घोषणा करणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून तेच यावर सूचना करतील. जळगाव आणि नाशिक अशा दोघा जागांसदर्भातील महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत, काँग्रेसकडून वंचित उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठकींचे सत्र सुरूच आहे. काल रात्री पाठिंबा संदर्भात दोन बैठका झाल्या. वंचितच्या उमेदवारा सोबत एक गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील काँग्रेस नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बैठकीतील निर्णय कळवला जाणार आहे. यानंतर पाठिंब्याचा निर्णय होईल. दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख निवडणुकच्या रिंगणात असल्याचं ठामपणे सांगत आहे.
महाराष्ट्र काँग्रेस अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून चांगली धुसफूस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं आहे. संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी काँग्रेससोबत यावं. संविधान विरोधी केंद्रातील सरकार उखडून टाकण्यासाठी, सत्तेबाहेर काढण्यासाठी एकत्रित यावं, असे नाना पटोले यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी दिली आहे.
शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा घातला. या कचोरी सेंटर वरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
काॅक्रोच जनता पार्टीने पुण्यात आंदोलन करताच, भविष्यात, नागपूर, लखनऊ आणि बंगळुरू यासह देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा व्यक्त होणाऱ्या तरुणांचे म्हणणे समजून घ्या. मात्र केंद्रातील सरकार चर्चा तयार करायला नाही, असा घणाघात अभिजीत दिपके यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.