Political News : आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीमध्ये एकत्रित लढविणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. या पुढील काळात पक्षाच्या भूमिकेत कुठलाच बदल होणार नसल्याचे सांगत सुनील तटकरे यांनी सर्व चर्चा खोडून काढल्या.
मुंबईत शुक्रवारी (22 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मीडियाशी संवाद साधला. सहा महिन्यांपासून आम्ही भाजप व शिवसेनेसोबत महायुतीमध्ये एकत्रित काम करीत आहोत. आमच्या भूमिकेत कोणताच बदल झालेला नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत, आणि त्याच ठिकाणी राहणार आहोत. त्यामुळे त्याची कोणी चिंता करू नये, असे सांगत त्यांनी विरोधकांकडून केले जात असलेले सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर शेलक्या शब्दांत निशाणा साधला. काही जणांकडून केवळ स्टंटबाजी केली जात असून त्याकडे कोणी लक्ष देऊ नये, असे सांगत आव्हाड यांनी अजित पवार (Ajit Pawar)गटाच्या नेतेमंडळीवर केलेल्या आरोपातील हवाच काढली आहे. यावेळी पार पडलेल्या अजित पवार गटाच्या बैठकीस पक्षातील मंत्री, ज्येष्ठ नेते व आमदार मोठया संख्येने उपस्थित होते.